वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी वेतन निश्चिती प्रस्तावाबाबत लेखाधिकारी यांना निकषांच्या आधारे वेतन निश्चिती करण्याबाबत परिपत्रक जारी करावे, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस व राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप कालेकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक मा. सदीप संगवे साहेब याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २६ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी करिता असलेल्या निकषांमध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी करिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी तातडीने जाहीर करावी असे नमूद केलेले आहे. परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ६ नुसार शासन निर्णय दि. २६ ऑगस्ट २०१९ अधिक्रमित करण्यात आला आहे.
दि. २० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मा. लेखाधिकारी वेतन निश्चिती करून देत आहेत. परंतु काही जिल्ह्यामध्ये मा. शिक्षणाधिकारी महोदयाच्या मजुरी शिवाय वेतन निश्चिती केली जात नाही.मा. लेखाधिकारी (शिक्षण) हे वेतन निश्चिती करणारे सक्षम अधिकारी आहेत. सर्व निकष तपासूनच ते वेतन निश्चिती करीत असतात. मा.. शिक्षणाधिकारी यांच्याकडे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रस्ताव मंजुरीकरिता सादर केल्यास वेळेचा अपव्यय होऊन प्रस्ताव प्रलंबित राहतील. यावर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाकरिता परिपत्रक निर्गमित करून सुसूत्रता आणावी.तसेच नुकतेच एससीईआरटी ने इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत राज्यातील सुमारे ५२ हजार शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण करून घेतले आहे व लवकरच उर्वरित सुमारे ५० हजार शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. यापैकी अनेक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी करिता पात्र आहेत. तरी मा. लेखाधिकारी यांना निकषांच्या आधारे वेतन निश्चिती करण्याबाबत परिपत्रक जारी करावे अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेने केली आहे.