शहरात स्थानिक स्वराज्य सस्थाच्या निवडणुकाच्या अनुषंगाने नगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी आक्षेप घेतला असून, प्रभाग क्रमांक सहा आणि सातमधील रहिवाशांनी हरकती दाखल केल्या आहेत. या संदर्भात धर्मेंद्र पाटील, राजू अग्रवाल, डॉ. पंचाल, श्री. बलेसरिया यांच्यासह प्रभागातील रहिवाशांनी पालिका कार्यालयीन अधिकारी भरत सोनार यांना निवेदन सादर केले.
नागरिकांच्या मते, प्रारूप प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. अनेक कुटुंबे दोन वेगवेगळ्या प्रभागांत विभागली गेली असून, काही ठिकाणी गल्ल्या आणि रस्ते वेगळे केल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. नगरपालिकेने १८ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, प्रभाग सहा आणि सातमधील नागरिकांनी २९ ऑगस्ट रोजी तीन हरकती दाखल केल्या.
नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या हरकतींवर ठोस कारवाई करून प्रभाग रचनेत बदल करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा, कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशाराही त्यांनी दिला. या रचनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
Tags:
सामाजिक