नवापूर आगारातून सुटलेल्या बसमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोठा अपघात टळला. प्रसंगावधान राखून धाडसी निर्णय घेतल्याने चालकाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचवले. या घटनेनंतर चालकाच्या शौर्याचे कौतुक होत असले तरी, एस.टी. महामंडळाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपघाताचा थरारक प्रसंग
१८ ऑगस्ट रोजी नवापूर आगाराची बस (एम.एच. २० बी.एल. ३०४६) खेतीया मार्गे सुरतच्या दिशेने निघाली होती. बसचालक दीपक तोरिस व वाहक रोशन चापले यांच्या ताब्यात होती. बसमध्ये ४२ प्रवासी होते. त्यापैकी ३५ प्रवासी सुरतला जात होते, तर उर्वरित प्रवासी नवापूरकडे परतणार होते.
विसरवाडी गावाजवळील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अचानक बसची पॉवर स्टीयरिंग ऑइल पाईप फुटली व स्टीयरिंग पूर्णपणे निकामी झाले. रस्त्यावरुन धावणारी बस काही क्षणात उलटण्याची किंवा खड्डयात जाण्याची भीती होती. मात्र चालक तोरिस यांनी धैर्य दाखवतबस सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे मोठा
अनर्थ टळला.
या प्रसंगानंतर प्रवाशांनी चालकाचे अभिनंदन केले. काही प्रवाशांनी "आमचा जीव वाचवणारा देवदूत" अशी प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे या घटनेमुळे एस.टी. प्रशासनावर प्रवाशांचा रोष व्यक्त होत आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, राज्य परिवहन मंडळाने सातत्याने भाडेवाढ केली, परंतु प्रवासाच्या सुविधा मात्र सुधारलेल्या नाहीत. नवापूर आगाराच्या ताफ्यातील बहुतांश बस जीर्ण झाल्या असून, त्यांची नियमित दुरुस्ती होत नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. ५०० किलोमीटर लांब पल्ल्याच्या मार्गावर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, ही शोकांतिका आहे," असे प्रवाशाचे म्हणणे आहे.महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती असल्याने नवापूर आगाराला महत्त्व आहे परंतु परिवहन विभाग नवापूरच्या प्रवाशांकडून नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे जिल्ह्यातील इतर आगारांमध्ये अनेक नवीन बसेस आल्या आहेत पण नवापूर आगाराची फक्त 5 बसेस वर समजूत घातल्याने प्रवासी नाराज असल्याची चर्चा जोरात आहे.
नवापूर आगारातून दररोज हजारो प्रवासी रोजगार, शिक्षण व इतर कारणांसाठी सुरत, भरुच, अंकलेश्वर या भागात जातात. मात्र, जीर्ण व धोकादायक बसेसमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नवापूर आगारासाठी आधुनिक व सुरक्षित बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
Tags:
सामाजिक