पवित्र श्रवण महिन्याचे औचित्य साधून, सर्वत्र भक्ती आणि उत्साहाला उधाण आले असताना, नवापूर शहराने आज एक अभूतपूर्व असा नयनरम्य सोहळा अनुभवला. . श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समितीच्या पुढाकाराने आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ. संगीताताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेत शेकडो महिला भाविक सहभागी झाल्या होत्या. रंगावली नदीपासून निघालेल्या या यात्रेने संपूर्ण शहरात भक्तिमय चैतन्याचे वातावरण निर्माण केले होते. रंगावली तीरापासून शिवमंदिरापर्यंत भक्तीचा प्रवाह नवापूर शहरातील शेकडो महिला भाविक रंगावली नदीच्या तीरावर एकत्र जमल्या.
भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म आणि मुखात हर हर महादेव'चा अखंड जयघोष करत या महिलांनी नदीचे पूजन करून पवित्र जल आपल्या कलशांमध्ये भरले. सुशोभित कावडी खांद्यावर घेऊन, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यात्रेला सुरुवात झाली. रंगावली नदीपासून ते श्रीद्वारकेश्वर महादेव मंदिरापर्यंतचा मार्ग अक्षरश शिवभक्तीच्या प्रवाहाने न्हाऊन निघाला होता. वाटेत ठिकठिकाणी नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून कावड यात्रेचे स्वागत केले, ज्यामुळे यात्रेकरूंचा उत्साह अधिकच वाढत होता.
महिला शक्ती आणि श्रद्धेचा मिलाप - संगीता गावित
या कावड यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ. संगीता गावित यांनी यात्रेकरूंचा उत्साह वाढवला. त्या म्हणाल्या, श्रावण मास हा भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात कावड यात्रा करणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. ही यात्रा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती महिला शक्ती, एकता आणि आपल्या सनातन संस्कृतीवरील अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. दरवर्षी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती अत्यंत निष्ठेने या परंपरेचे जतन करत आहे, हे पाहून मनस्वी आनंद होतो."
Tags:
धार्मिक