शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५ शिक्षण कट्टयावर चर्चा

    मुंबई सत्यप्रकाश न्युज
    'शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५' या विषयावर शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ या दिवशी दुपारी ४. ते सायं.६ या वेळेत राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षणकट्टयाचे आयोजिन करण्यात आले होते. 
 यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी कट्ट्यासाठी उपस्थित असणाऱ्याचे सुरूवातीस स्वागत  केले. यावेळी त्यांनी कट्ट्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. राज्य शासनाने नुकताच शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा-२०२५ प्रसिद्ध केला आहे. हा मसुदा जनतेच्या अभिप्रायासाठी खुला करण्यात आला असून याबाबतची शैक्षणिक भूमिका तयार व्हावी या हेतूने कट्टयाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मसुद्याबाबतचे अभिप्राय राज्यशासनाकडे पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. 
    शिक्षण विकास मंचाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ  डाॅ. वसंत काळपांडे यांनी प्रास्तविक केले. लवचिकता हे या अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून तो तयार केला आहे.  या अभ्यासक्रमात काय असायला हवे याबाबत सूचना यायला हव्यात, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांकरिता आहे त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा अभ्यासक्रम तयार व्हावा, हा विचार कट्टयाच्या आयोजनामागे असल्याचे त्यांनी सांगितले. 
   शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून संपदा जोशी (मराठी), स्वाती ताडफळे (मराठी), अचला मचाडो (इंग्रजी), अजित तिजोरे (गणित), शशिकला पाटील (विज्ञान), राहुल प्रभू (इतिहास, नागरिकशास्त्र), भाऊसाहेब उमाटे (इतिहास, राज्यशास्त्र),  पद्माकर हिरनाईक (भूगोल), दिनेश जोशी (अर्थशास्त्र) या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.  तसेच शासनाला तपशीलवार सूचना केल्या. विषयतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक यांच्याकडून आलेल्या सूचना शिक्षण विकास मंचकडून एससीईआरटीकडे पाठवण्यात येणार आहेत.
  कट्टयाचा  समारोप शिक्षण विकास मंचच्या विशेष सल्लागार बसंती रॉय यांनी केला. मसुद्याबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना  कल्पना यावी म्हणून या कट्ट्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मसुद्यातील चांगल्या बाबी तसेच त्रुटींवर साधक बाधक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. हा अभ्यासक्रम अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ध्येयांना पूर्ण न्याय या मसुद्यात देण्यात आला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच  अभ्यासक्रम मसुद्याचा अभ्यास केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी समारोपाच्या मनोगतात केली. सोबतच या अभ्यासामुळे त्यांच्या अध्ययन अध्यापनाला दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. योगेश कुदळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार म्हात्रे यांनी केले. या राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षण कट्ट्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.*एकूण 5.7k views, 285 कमेंट, 275 लाईक्स, 35 ठिकाणी* हा कार्यक्रम शेअर करण्यात आला. ज्यांना वेळेमुळे हा कार्यक्रम पहाणे शक्य झाले नाही त्यांनी पुढील युट्यूब लिंक वरून हा कार्यक्रम पहावा.
https://youtu.be/T5qRSNLDkNQ?si=Dyw5op-mLlJmkili*

 

Post a Comment

Previous Post Next Post