नवापूर वरिष्ठ महाविद्यालयात अभिरूप युवा संसद संपन्न

नवापूर सत्यप्रकाश न्युज
   येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर आणि युवक बिरादरी (भारत )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक 7 मार्च 2024 रोजी अभिरूप युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जी. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या अभिरूप युवा संसदेचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.जी. भदाने व उपप्राचार्य डॉ. एम. ए. गावित  मॅडम तसेच  कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मुख्य मार्गदर्शक डॉ.रवी गावित  (प्रोजेक्ट डायरेक्टर, युवक बिरादरी मुंबई विभाग) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. 
माझा जाहीरनामा या मुख्यसंकल्पनेला अनुसरून, वित्तमंत्री म्हणून माझा जाहीरनामा, आरोग्य मंत्री म्हणून माझा जाहीरनामा, पर्यावरण मंत्री म्हणून माझा जाहीरनामा, शिक्षण मंत्री म्हणून माझा जाहीरनामा,  गृहमंत्री म्हणून माझा जाहीरनामा इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांनी  आपापल्या विषयाची मांडणी केली. नवापूर महाविद्यालय, विसरवाडी महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. एकूण पंधरा स्पर्धकांनी आपापल्या विषयाला अनुसरून  बाजू मांडली. त्यामध्ये प्रथम तीन स्पर्धकांना  अडीच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रमाणपत्र व प्रत्येकी 500 रुपये देऊन गौरविण्यात आले. सदरील युवा संसदेमध्ये परीक्षक म्हणून मा. अरविंद वळवी, सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण विभाग मुंबई झोन आणि  सेवानिवृत्त प्रा.के. के. वळवी, मू. जे. महाविद्यालय जळगाव यांनी परीक्षकाची भूमिका अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडली. युवा संसदेमध्ये युवक बिरादरीचेचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. रवी गावित  यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. डॉ.रवी गावीत  यांनी या कार्यशाळेमध्ये  युवकांची भूमिका कशी असेल तसेच स्पर्धेचे नियम आणि अटी या विषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.अभिरूप युवा संसदेच्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरारीने भाग घेऊन  खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपापल्या विषयाची मांडणी केली आणि देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जाहीरनाम्याचे महत्त्व आणि आदर्श जाहीरनामा कसा असावा असा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडला.
    अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.ए.जी  जयस्वाल  यांनी देशाच्या विकासाच्या आणि सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे कार्यक्रम युवा वर्गासाठी होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन सुद्धा केले. महाविद्यालयाच्या उप प्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ. एम . ए. गावित मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माझा जाहीरनामा या संकल्पनेवर आधारित जी कार्यशाळा आयोजित केली आहे ती खऱ्या अर्थाने एक युवकांमध्ये जनजागृती करणारी ठरेल असा विश्वास त्यांनी आपल्या मनोगत मधून केला. कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.  विभाग प्रमुख प्रा. ई . एस. गेडाम यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागातील प्रा. अनिल गावित यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ई.एस गेडाम यांनी केले.आभार प्रदर्शन आणि पाहुण्यांचा परिचय मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जी.एस. बोरदे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील  विद्यार्थी उपस्थित होते आणि संसदेमध्ये कशा पद्धतीने प्रश्नोत्तराचा तास चालतो याची अनुभूती सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post