नवापूर शहरात यंदाच्या गणेशोत्सवात एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून विविध आठ गणेश मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ज्या भाविकांना प्रत्यक्ष अष्टविनायक यात्रा करून दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथेच दर्शन व्हावे हा हेतू बाळगून एका भक्ताने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख अष्टविनायक गणपती प्रसिद्ध आहेत. तथापि आर्थिक, शारिरीक वा अन्य अडचणींमुळे असे अनेक भाविक असतात ज्यांना प्रत्यक्ष अष्टविनायक यात्रा करून दर्शन घेणे इच्छा असूनही शक्य होत नाही. नेमकी हीच बाब हेरून शहरातील गणेश भक्त विजय प्रभातीलाल अग्रवाल आणी जयेश दिनेश अग्रवाल यांनी शहरातील भाविकांना अष्टविनायक गणपती दर्शन घडविण्याचा हेतू बाळगून अभिनव उपक्रम राबविण्याची योजना आखली. या साठी त्यांनी शहरातील काही समविचारी मंडळींची मदत घेतली. या नुसार अष्टविनायक गणपतींच्या शास्त्रोक्त शाडू मातीच्या मुर्ती स्थानिक मुर्तीकार सौ. संगिता साळुंखे यांनी तयार केल्या असून गणेशोत्सवात शहरातील विविध आठ गणेश मंडळांमध्ये या अष्टविनायक गणपती मुर्तींची स्थापना गणेश चतुर्थीला करण्यात येणार आहेत व गणेशोत्सवात दहा दिवस भाविकांना त्यांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.
यानुसार प्रथम गणपती मयुरेश्वर श्री गणपती मंदिरात. द्वितीय गणेश सिद्धिविनायक श्री दादा गणपती मंडळात, तृतीय गणेश बल्लाळेश्वर श्री बाबा गणपती मंडळात, चौथा गणपती वरदविनायक भोईराज गणेश मंडळात, पाचवा गणपती चिंतामणी अग्रवाल भुवन मंडळात, सहावा गणपती गिरीजात्मज शास्त्रीनगर गणेश मंडळात, सातवा गणपती विघ्नेश्वर जनता पार्क गणेश मंडळात, तर आठवा गणपती महागणपती श्री संगम गणेश मंडळात या प्रमाणे स्थापना करण्यात येणार आहे.
या उपक्रमात लागणारे सारे नियोजन व सुशोभीकरण जयेश अग्रवाल स्वतः करीत आहेत आणखी संबंधित गणेश मंडळांसह शहरातील काही भाविकही सहकार्य करीत आहेत. नवापूर शहर व परिसरातील भाविकांनी गणेशोत्सवात या उपक्रमात सहभाग घेऊन अष्टविनायक गणपती दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Tags:
धार्मिक