आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिन विशेष मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक व काव्यप्रेमी शिक्षक मंच चे राज्याध्यक्ष मा.आनंद घोडके सोलापूर यांचा "पुत्र म्हणूनी प्राणाहूनी जपेल जननी तुजला" हा विशेष लेख --------

                  दिनविशेष 
नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     सध्या आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करित आहोत. देशाने लोकशाहीचेही सत्तरी पार केले आहे. दरम्यानच्या काळात आपल्या स्वतंत्र गणतंत्र असलेल्या देशाला चांगले वाईट अनेक चढ-उतार पहावे लागले आहेत. एका स्वतंत्र गणतंत्र देशाने करावे तेवढे कार्यकर्तृत्वही पार पाडले आहे. एका महासत्ताक देशाच्या दिशेला मार्गक्रमण करण्याचा उत्तम प्रयत्नही झाले आहेत, होत आहेत. स्वातंत्र्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळातील लोकशाहीच्या मार्गातील अडथळा ठरत असलेली संस्थाने प्रजासत्ताक देशाच्या अंमलाखाली आणण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांना अनेक प्रयत्न करावे लागले. 
    सरदारांच्या मनातील श्रेष्ठ भारत निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्यानंतरही देशवासीयांना मुक्ती लढाया लढावे लागले. जम्मू काश्मीरचा मुद्दा आता तीन राज्यात विभागल्यानंतर शांत झाला असला तरी त्यासाठी देशाला मात्र खूप काही सोसावे लागले आहे. जम्मू काश्मीर वगळून संपूर्ण देशात दाही दिशांना फडकणाऱ्या तिरंग्याला किती काळ प्रतिक्षेत रहावे लागले याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत. कला, क्रिडा, साहित्य, संरक्षण, कृषी, औद्योगिक सारख्या हर एक विभागात प्रगतीचे पाऊल उमटलेले आहेतच.
     लोकशाही तत्वे भारतीयांच्या मनात पूर्ण उतरले आहेत की नाही यापेक्षा इथल्या एकतेचा गौरव संपूर्ण जगात होते हे काही कमी महत्त्वाचे नाही! कधी पाकीस्तान तर कधी चीनच्या कुरापती आपण सहन करतोच आहोत. आजतागायत अनेक भूमिपुत्र दहशतवादी कारवायांना बळी पडले, शहीद झाले परंतु, सर्जिकल स्ट्राईकचा स्ट्रोक मात्र शत्रूंच्या मेंदूला चांगलाच झोंबला आहे हे विसरून चालणार नाही. आपल्या देशाचा इंच भागही आपल्यासाठी किती मोलाचा आहे हे वारंवार दर्शवून झाले आहे. संरक्षण विभागातील झालेले आमूलाग्र बदल देश सुरक्षित असल्याचे सदैवच ग्वाही देतात हे अचूकपणे लक्षात येतेच येते.
     वेगवेगळ्या क्षेत्रातील काही ताजी उदाहरणे पाहता प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या महान भारताची अचूक ओळख होते. परवाच भारतीय क्रिकेट संघानेही बऱ्याच आंतरराष्ट्रीय संघाचे स्वप्न धुळीस मिळवून "हम कुछ कम नहीं" हे सिद्ध करून दाखवले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणाऱ्या "ग्लोबल टिचर" अवार्ड जिंकणाऱ्या डिसले गुरूजींनी देशाची शैक्षणिक मान उंचावली आहे. कोरोनाचा कहर संपूर्ण जगाने झेलले आहे. पण म्हटले जाते की अवाढव्य लोकसंख्या असणाऱ्या भारताने प्रगत राष्ट्रापेक्षाही कितीतरी अधिक पटीने यशस्वीरीत्या अनेकदा विविधस्तरीय लढाया जिंकलेले आहे त्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. बऱ्याच क्षेत्रातील वानवा ही विसरून चालणार नाही. खूप मोठी जनसंख्या असल्याने भूकबळी, आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, बेरोजगारी, बलात्कार, खून-दरोडे, महामारी, शेतीविषयक अनेक समस्या अजूनही आ वासून आहेत. मात्र यासाठी केवळ शासनच जबाबदार आहे असे म्हणून चालणार नाही. "मेरा भारत महान" म्हणणाऱ्या प्रत्येक देशवासीयाच्या धमण्यांमध्ये लोकशाहीची तत्वे रूजली पाहिजेत तेव्हा कुठे आपल्या प्रजासत्ताक देशाला आणखी चांगली प्रगती साधता येईल.
     केवळ कोणाच्या गुलामगिरीतून मुक्त होणे म्हणजेच स्वातंत्र्य आहे का? याचा विचार आपण कधी करणार आहोत. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर देशांनी, देशातील लोकशाहीनी आपल्याला भरभरून दिलं आहे परंतू केवळ काही तरी मिळतं म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत असू तर हे सर्वार्थाने परिपूर्ण विचारशैली नाही. "आपला देश महान" म्हणण्यासाठीच आपला जन्म झाला नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून झटण्यासाठी आपण जन्मलो आहोत. हा विचार आपल्यात रूजणे आवश्यक आहे. अगदी सध्याची परिस्थितीचे आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोतच की! शासन अथवा सरकार देश कोरोनामुक्त करू पाहत आहे. कोरोनाशी अनगिनत योध्दे लढा देत आहे. लसीकरणाच्या आकड्यातही जगात आपला देश अव्वल आहे. शासन आपणाकडून काय अपेक्षा करत आहे? एवढेच ना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, स्वच्छतेचा मंत्र जपा, सामाजिक अंतर राखा, सामाजिक बांधिलकी जपा परंतू याचा अंमल कितीजण करत आहेत हे तर आपल्याला माहितच आहे. या सर्व बाबी आपल्या हितासाठीच आहेत हे आपल्याला कधी समजणार आहे. 
      देशवासीयांना एकच विनंती आहे.  "लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही"  हे केवळ परिक्षेत लिहण्यासाठीचे वाक्य नसून ते दैनंदिन जीवनात उतरवून घेण्याची गरज आहे. आपण देशासाठी आहोत हे आपण ओळखले म्हणजे देश आपला आहे ही आपल्यातली भावना खऱ्या अर्थाने सिध्दीस जाईल. त्यासाठी आपण साऱ्यांनीच 
"हे स्वतंत्र भारतमाते,
शतशत नमन तुला
हे स्वतंत्र भारतमाते
अभिमान तुझा मजला
पुत्र म्हणूनी प्राणाहुनी
जपेन जननी तुजला"
या ओळी अंतरंगात उतरवलेच पाहिजे.
   जय हिंद 
                  मा. आनंद घोडके, सोलापूर
                       ७३९७८१३२३६

3 Comments

  1. आनंदजी, खूप छान लेख लिहिला आहेत 🙏🏻🌹

    ReplyDelete
Previous Post Next Post