नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
आगामी गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलातर्फे आज दि. 12/08/2025 रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पोलीस मुख्यालय मैदान, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हयातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये गणेश मंडळांचे परिसरातील सुरक्षा व्यवस्था, वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे नियंत्रण, मिरवणूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्था तसेच वेळेचे बंधन पाळणे, सी.सी.टी.व्ही. देखरेख, आपत्कालीन सेवांची उपलब्धता, तसेच ध्वनीप्रदुषण नियंत्रणासंबंधी नियम पाळणे अशा विविध मुद्दयावर पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचेकडुन सुचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीदरम्यान जिल्हयाभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या गणेश मंडळांचे प्रतिनिधींनीही आपले मत व अडचणी मांडल्या. तसेच गणेशोत्सवाचे दरम्यान जिल्हा पोलीस दलास आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.यावेळी बोलतांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी नागरिकांना आवाहन केले की, " गणेशोत्सव हा आनंद, भक्ती व एकतेचा सण असून तो शांततेत, सुरक्षिततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारचा धार्मिक वाद, अफवा किंवा गोंधळ निर्माण होऊ न देता पोलीस प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्यास आढळून आल्यास त्याबाबत जिल्हा पोलीस दलास कळवावे ".
सदर कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग श्री. संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा, अक्कलकुवा उपविभाग श्री. दत्ता पवार, नगरपालीकेचे कार्यकारी अधिकारी श्री. राहूल वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच जिल्हयाभरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक असे 350 ते 400 नागरिकांची उपस्थिती होती.
Tags:
शासकीय