दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचे दर्शन घडवून आणणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गुजराती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश प्रजापत आणि सार्वजनिक मराठी हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ हे उपस्थित होते.सोबत शाळेचे मुख्याध्यापक संजय कुमार जाधव , उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख, उपप्राचार्य नरेंद्र पाटील , गुजराती पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एकताबेन देसाई, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सादिया पठाण, पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे व उर्दू विभागाचे पर्यवेक्षक जाहिद खान पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर, आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीवर आधारित एक व्हिडिओ डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनशैलीची सखोल माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक भव्य कला प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वस्तू, जुन्या काळातील घरगुती वस्तू, शेतीची अवजारे, शिकारीची साधने, पारंपरिक वाद्य आणि रानभाज्या यांचा समावेश होता. या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना श्रीमती चंद्रकलाबेन जाधव व श्रीमती यास्मिन फकीर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी कॉमर्सची विद्यार्थिनी कुमारी गौरी जाधव हिने केले. मुख्याध्यापक संजय कुमार जाधव यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप सर्व विद्यार्थ्यांच्या सामूहिक आदिवासी नृत्याने झाला, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आली.
दरम्यान, 09 जून 2025 रोजी शाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुसरा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख यांच्या हस्ते याहा मोगी माता व वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य . नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे, उर्दू विभागाचे पर्यवेक्षक श्री. जाहीद खान पठाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती गीता राजपूत यांनी केले.
Tags:
शैक्षणिक