विसाव्या शतकाच्या प्रारंभीलाच मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या. त्यावेळी 1911 ला ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली होती. एका भाषिक राज्याचे दोन भागात विभाजन केले होते ते रद्द करण्यात आले त्यामुळे एकच भाषा बोलणार्या लोकांचे एक राज्य असावे या भावनेला जोर मिळाला. टिळकांनी सुद्धा 1915 मध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. परंतु ही भाषावार प्रांतरचनेची मागणी त्या वेळी जोर धरू शकली नाही कारण त्यावेळी भारत स्वतंत्र झाला नव्हता देशाला अगोदर पारतंत्र्यातून मुक्त करणे ही भावना वाढीस लागली होती. मात्र मराठी भाषिक लोकांच्या राज्याच्या मागणीची सुरुवात झाली होती. त्यानंतर काही काळाने 12 मे 1946 ला बेळगाव येथील साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला.
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ फोफावत होती. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या तयारीत नव्हती त्यामुळे आंदोलन सुरू झाले. अशाच एका आंदोलनात राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणार्या या 106 जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा स्मारक मुंबई येथील फ्लोरा फाउंटन जवळ उभारले गेले. या आंदोलनात मराठी वृत्तपत्रांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
पंतप्रधान पंडित नेहरू यांना मराठी भाषिकांच्या भावना आणि महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीची जाणीव होती. हे समितीचे फार मोठे यश होते. इतक्या नेटाने संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला लढा दिला की त्याला शेवटी यश आलेत. केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यास तयार झाले. त्यातच तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधींनी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या बाजूने निर्णय दिला. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा संमत केला. त्यानुसार 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राबरोबरच गुजरात हे देखील भाषिक राज्य निर्माण झाले.1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले.
महाराष्ट्र निर्मितीसाठी अनेक लोकांनी आपले बलिदान दिले आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे आपल्या मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. पण सध्या महाराष्ट्राचे बदलती परिस्थिती मात्र मनाला खूप अस्वस्थ करते. अनेक लोक आपल्याच लोकांच्या विरोधात भांडत आहेत. महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. या सगळ्यांची जात आणि धर्म सारखाच आहे. पण तरीही आम्ही धर्मांध लोक धर्माच्या नावावर दंगली घडवतोय, जाती-धर्मात भांडणं लावतोय, राज्याची एकता आणि एकात्मतेला धोका पोहोचवत आहोत त्यामुळे महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. ज्या राजा सगळ्यांनी आनंदाने राहणे अपेक्षित होते त्याच महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि मशीद येथील भोंग्यावरून वाद सुरु आहेत.या अशाच धर्मांध लोकांचा वापर करून आजचे राज्यकर्ते राजकारण करत आहेत. सध्याच्या राजकारणाचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यात कोठेही समाजकारण दिसून येत नाही.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था मात्र फार भयानक आहे.आजही त्यांना कर्जमाफीची खोटी स्वप्ने दाखवली जात आहेत. कर्जाच्या डोंगराखाली तो चिरडून मरतो आहे. त्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही.आजच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही अवस्था खूपच गंभीर आणि तितकीच चिंताजनक आहे.
महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. तो पुढे नेणे गरजेचे आहे पण सध्याची परिस्थिती पाहता आजचे काही लोक या महापुरुषांचे विचार पायदळी तुडवताना दिसत आहे. महापुरुषांचे समाजकल्याणकारी विचार जपताना कोणी दिसत नाही. मात्र या महापुरुषांना आजच्या महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावावर विभागले जात आहे, हे किती योग्य आहे?ज्या राज्यात दर तासाला स्त्रीभ्रूणहत्या होते,विनयभंग होतो, बलात्कार होतो,हुंडाबळी मुळे अनेक महिलांना मारलं जातं ज्या, राज्यात शेतकरी आत्महत्या होते, जाती-धर्माच्या नावावर भांडतात,तो महाराष्ट्र पुरोगामी असू शकतो का?कोपर्डी सारखी अत्यंत दुःखद घटना जमा या महाराष्ट्रात घडते तेव्हा ही घटना मनाला विलक्षण चटका देऊन जाते.
पुरोगामी महाराष्ट्राची संकल्पना तरी काय? 'पुरो'म्हणजे 'पुढे'आणि 'गामी' म्हणजे 'जाणारा', पुढे जाणारा. मागच्या घटनाचे पुनरावलोकन चिकित्सा आणि त्यातला स्वार्थाने चुकीच्या वाईट अन्यायकारक गोष्टीचे निर्मूलन आवश्यक आहे. तरच महाराष्ट्र पुढे जाणार आहेत म्हणजेच तो पुरोगामी होणार आहे.स्वतंत्र राज्य निर्मितीच्या इतक्या वर्षानंतर प्रगती होणे अपेक्षित आहे.मात्र महाराष्ट्राचा प्रवास नेमका कोठे चाललाय विकासाकडे की अधोगतीकडे...! या प्रश्नावर मात्र संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणतात,"जसा गुजरात मध्ये राहणारा गुजराती,बंगाल मध्ये राहणारा बंगाली, तसा महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती मराठी आहे."त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी आपल्याला आदर वाटला पाहिजे. महाराष्ट्राला खूप समृद्ध असा इतिहास आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने याचा विचार केला पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करतोय? महाराष्ट्र साठी काय करतोय? महाराष्ट्र हे उत्तम राज्य कसे होईल यासाठी आपण किती धडपडतो? किती प्रयत्नशील आहोत?
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकर या महापुरुषांचे विचार केवळ वाचून चालणार नाही तर ते आचरणात आणले पाहिजे. तरच आपल्या स्वप्नातील खूप सुंदर,उत्तम असा महाराष्ट्र निर्माण होईल.
वैष्णवी संतोष पाडले
गडहिंग्लज, कोल्हापूर
8080025191
खूप छान
ReplyDelete