शिकाऊ अनुज्ञप्ती व वितरकामार्फत नोंदणी अशा दोन फेसलेस सेवा परिवहन कार्यालयामार्फत देण्यात येत होत्या. केंद्र शासनाने नागरिकांना 18 प्रकारच्या सेवा आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस पद्धतीने देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता परिवहन कार्यालयात आणखी 6 सेवा फेसलेस पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
परिवहन विभागामार्फत नागरिकांना 115 सेवा देण्यात येतात त्यापैकी 84 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. या सहा नवीन सेवांचा लाभ घेण्याकरीता अर्जदाराकडे आधारकार्ड व त्या आधारकार्डशी मोबाईल नंबर जोडणी असणे आवश्यक असून 18 सेवांचा लाभ घेण्याकरीता आधारक्रमांकाचा वापर करण्यात येणार असून आधार क्रमांकामधील मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येईल. ओटीपीची नोंदणी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर केल्यास अनुज्ञप्ती नोंदणी प्रमाणपत्र मधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे.
यात अर्जदाराचे नाव, पत्ता,जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यावर दुय्यम नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज, वाहन चालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण, ना-हरकत प्रमाणपत्र, वाहन चालक अनुज्ञप्तीवरील पत्ता बदल, नोंदणी प्रमाणपत्र वरील पत्ता बदल, वाहन चालक अनुज्ञप्तीचे नुतणीकरण या सहा सेवासाठी अर्जदारास परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता असणार नाही. अर्जदारांना नविन अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र पोस्टाने पाठविण्यात येईल. यासेवामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत तसेच कागदपत्राची प्रत काढण्याची आवश्कता नसल्याने कागदाची सुध्दा बचत होणार आहे. तरी नागरिकांनी या सहा नवीन फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.
0000