गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी सिस्टिमवर बंदी, वापर केल्यास होणार कठोर कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आवाहन........
नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज
जिल्ह्यात मागील काही दिवसात साजरे झालेले रमजान ईद, शिवजयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी, मोहरम, विश्व आदिवासी गौरव दिन तसेच आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळान पोलीस दलाच्या आवानास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी. शेखर पाटील यांचे हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील 235 मंडळांच्या पदाधिका-यांना प्रशंसापत्र देवून सत्कार करण्यात आला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती.
दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना / विसर्जन मिरवणुकीचे वेळी ध्वनी प्रदुषण निर्माण होईल अशी साधने डी. जे. व डॉल्बी यांचा वापर करण्यावर ध्वनी प्रदुषणाचे नियंत्रण व नियमन तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सण व उत्सव साजरे करतांना डी. जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदुषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी. जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी दिनांक 31/08/2022 ते दिनांक 09/09/2022 पावेतो डी. जे. व डॉल्बी सिस्टिमवर बंदी घालण्यात आलेली आहे व त्याबाबतचे सविस्तर आदेश देखील निर्गमीत केलेले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी. जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे. डी.जे. व डॉल्बीचा वापर केल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.
तसेच गणेशोत्सव काळात समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मुद्दाम सोशल मिडीयाच्या माध्यमातून खोट्या बातम्या fear अफवा पसरवून नागरीकांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करु शकतात त्यामुळे नागरीकांनी व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती / अफवा प्रसारित करु नये.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण सरंक्षण कायदा कलम 15 प्रमाणे 5 वर्ष कैदेची किंवा 1,00,000/- (एक लाख रुपये दंड) किंवा दोन्ही शिक्षा होवु शकतात. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे केल्यास 5000/- रुपये दंड प्रत्येक दिवसाला व शिक्षा लागल्याच्या । वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षा होवू शकते, त्यामुळे गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात करु नये, तसे आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार 02564-210100/- 210113 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पी. आर. पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार
Tags:
धार्मिक