नंदनगरीचा राजा दादा गणपतीची रांगोळीतून साकारली भव्य प्रतिकृती..... नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज:- शहर आणि जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या नंदनगरीचा राजा श्री दादा गणपती यांची हुबेहूब प्रतिकृती भव्य रांगोळीच्या माध्यमातून गौरव माळी या कलाकाराने साकारली आहे. सदर प्रतिकृती पाहण्यासाठी गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे.
गतवर्षी गणेशोत्सव काळात गौरव माळी या कलाकाराने लालबागच्या राजाची प्रतिकृती रांगोळीद्वारे रेखाटली होती. यंदा साक्षात नंदनगरीचा राजा श्रीदादा गणपतीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे. या भव्य रांगोळी प्रतिकृती प्रदर्शनाचा शुभारंभ आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ.विजयकुमार गावित व खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते गणपती मंदिरात झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी मंदिराचे पुजारी प्रदीप भट, राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, नगर पालिकेचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंदा माळी, आकाश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी, प्रफुल पाटील आणि भक्त जण उपस्थित होते. यावेळी डॉ.गावित यांच्या हस्ते गौरव माळी आणि मंदिराचे पुजारी प्रदीप भट यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी कोरोना काळात कलाकार गौरव माळी यांनी लालबागचा राजाची रांगोळी रेखाटली होती. नंदुरबारकरांच्या पसंतीस उतरल्यानंतर यंदा नंदनगरीचे श्रद्धास्थान मानाचा दादा गणपती रांगोळी रेखाटण्यात आली.
सदर वैशिष्टपूर्ण रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंदिरात होत आहे.
सदर रांगोळीचे छायाचित्र काढून अनेक हौशी भाविकांनी सोशल मीडियावर प्रसारित केले आहे.