नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
दहा दिवसांचा गणेशोत्सव व श्रींची विसर्जन मिरवणूक यशस्वीरित्या पार पाडण्यास खऱ्या अर्थाने परिश्रम घेणाऱ्या पोलिसांनी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर काल नंदुरबार येथील शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस शाखेतील 'श्रीं'ची संयुक्त विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सजविलेल्या बैलगाडीवरून लाडक्या गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजरात गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करीत पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्यावर ठेका धरला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये श्रींच्या विसर्जन मिरवणूकीचा उत्साह दिसून आला.
सण- उत्सव म्हटला म्हणजे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असते. मागील दोन वर्षानंतर यावर्षी लाडक्या गणरायाच्या उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला सलग दहा दिवस गणेशोत्सवासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस खडा पहारा दिला. सण-उत्सव शांततेत साजरे व्हावे, यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे नेहमी कार्यतत्पर असतात. परंतु हे कर्तव्य बजवताना त्यांना सण-उत्सव साजरा करता येत नाही. नंदुरबार येथील शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेत लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीला श्रींची विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी ठीक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर असल्याने अनंत चतुर्दशीच्या सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सलग सकाळी दहा वाजेपर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. अखेरच्या टप्प्यातील श्रींचे विसर्जन शांततेत पार पडल्यानंतर सलग दहा दिवस खडा पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात स्थापन केलेल्या लाडक्या गणरायाची काल रविवारी विसर्जन केले. नंदुरबार शहर पोलीस ठाणे, नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे व नंदुरबार शहर वाहतूक शाखेच्या वतीने श्रींची मूर्ती सजविलेल्या बैलगाडीवर ठेवून विसर्जन मिरवणूक करण्यात आली.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ढोल ताशांवर लेझीम नृत्याच्या ठेका धरला. ही विसर्जन मिरवणूक नेहरू चौकात आल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, उपनगरचे पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्य करीत सहभाग नोंदविला.
Tags:
शासकीय