फटाके दुकान व परवान्यासाठी
नंदुरबार, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री व साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
फटाके विक्रींसाठी स्टॉलची संख्या एका ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉल मधील अंतर 3 मीटर पेक्षा कमी नसावे, तसेच बाहेरील सुरक्षीत अंतर 50 मीटर असल्यास दोन स्टॉल मधील अंतर 3 मीटर पेक्षा कमी नसावे, बाहेरील सुरक्षीत अंतर 50 मीटर पर्यंतचे व अशी स्टॉल दोन किंवा दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरासमोर 50 मीटर पेक्षा कमी अंतराची नसावी, प्रत्येक स्टॉलमधील वरील फटाक्याची एकूण परिमाणता 500 कि.ग्रामपेक्षा अधिक नसावी, प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र 10-20 चौ.मीटर पर्यंतचे असावे.
फटाके विक्रींची जागेची निवड करतांना एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगामधील स्टॉलचे दरवाजे समोरासमोर नसावेत, ते मागील बाजुने बंद असावेत. फटाका विक्री स्टॉलजवळ अग्निसुरक्षा व्यवस्था, आणि पाण्याचे साठे (टँकर ) ठेवणे आवश्यक असेल. स्टॅालमध्ये अग्नि उपद्रवास कारणीभुत ठरणाऱ्या वस्तू प्रतिबंधीत असेल. फटाका विक्री परिसरात दक्षता पथकाची गस्ती असावी. फटाका विक्री स्टॉलच्या परिसरात धुम्रपान प्रतिबंधीत राहील.
फटाका विक्री करताना फटाक्यासाठी 100 किलो ग्राम व शोभेचे झकाकणारे चायनिज फटाक्यासाठी 500 किलो ग्राम एवढा परिमाणापेक्षा जास्त परिमाण बाळगता येणार नाही. आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. गाडीतुन किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्री करता येणार नाही.
पर्यावरण सुरक्षा नियमानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासुन 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. तर साखळी फटाक्यांत 50, 50 ते 100 व 100 त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115, 110 व 105 डेसीबल एवढी असावी. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत दारुकाम व फटाक्याचा वापर करता येणार नाही.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्रात शांतता प्रभागात फटाक्याचा वापर करता येणार नाही. फटाका विक्री परवाना दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. परवाना मिळाल्याखेरीज फटाका विक्री करणे अवैध राहील. परवान्याशिवाय फटाके विक्री करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
फटाका विक्री व साठवणुकीसाठीचा विहीत नमुन्यातील परवानगी अर्ज 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर, 2022 पर्यंत वितरीत करण्यात येतील व अर्ज सादर करण्याची मुदत 26 सप्टेंबरपर्यंत राहील. पोलीस विभागाने सादर अर्जावर अभिप्राय कळविण्याची अंतिम मुदत 5 ऑक्टोंबर असेल तर शिफारशी अंती मंजूर परवाने वितरण 10 ते 15ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राहील.
परवानाधारकांनी विस्फोटक नियम 2008 आणि 1884 तसेच विस्फोटक विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000
Tags:
व्यावसायिक