"ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण"

 "गुरुजींची बदली आता होत आहे एका क्लिकवर"-गजानन पांचाळ
  नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   राज्यातील जि.प. शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी होणार्‍या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे.  प्रत्यक्षात 31 मे पूर्वीच बदली प्रक्रिया पूर्ण होणार होती, परंतु आपसी बदलीच्या सेवा ह्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ग्राह्य धराव्यात ही केस मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित होती, यासंबंधी निकाल नऊ मे रोजी लागला असल्यामुळे दि.१०मे २०२५ पासून जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शासनाने अचुक व जलद पातळीने प्रक्रिया सुरू केली.
 आजपर्यंत संवर्ग एक व संवर्ग दोनची  संपुर्ण बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संवर्ग-३ ची फॉर्म भरण्याची बदली प्रक्रिया सुधारित रिक्त जागा जाहिर होऊन दि. २८ जुलै पासुन सुरवात झाली असुन ती ३१जुलै अखेर चालेल. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन संवर्ग-३ अंतर्गत बदली झालेली शिक्षकांची यादी साधारणतः तीन अॉगस्ट पर्यंत जाहीर होईल. सातपुड्यातील दुर्गम व अवघड क्षेत्रातून होत असलेल्या या संवर्ग-३ मधील बदल्यांमुळे अनेक (साधारणतः तीनशे ते चारशे)  शिक्षकांवरील मागील शासन निर्णयात झालेला अन्याय दूर होणार आहे. त्यानंतर संवर्ग ४ अंतर्गत बदली प्रक्रिया सुधारित रिक्त जागा जाहीर झाल्यावर होईल.
 यंदाच्या बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ च्या तरतुदीनुसार विशेष संवर्ग एक, पती-पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन, बदली हक्क प्राप्त अवघड क्षेत्र संवर्ग तीन, सर्वसाधारण क्षेत्र संवर्ग चार याप्रमाणे या बदल्या होत आहे. या बदलींसाठी दिलेल्या पोर्टलवर  लॉगिंन होऊन शिक्षकांना सुलभ पध्दतीने अपेक्षित असलेल्या 30 शाळांचे पसंतीक्रम देवून बदल्या होतात. सेवा जेष्ठता व शासन निर्णयातील नमूद बाबींप्रमाणे शिक्षकांना ऑनलाइन बदलीचा आदेश प्राप्त होत असतो.
पूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या जिल्हास्तरावर ऑफलाइन पद्धतीने होत होत्या, या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र शासनास प्राप्त झाल्यामुळे शासनाने ऑनलाईन बदल्या करण्याचे  आधुनिक धोरण ठरविले आहे. या ऑनलाईन बदली धोरणामुळे शिक्षकांना भ्रष्टाचारमुक्त, दडपण विरहित तसेच स्वतःच्या मोबाईलवरच शाळा निवडीचे पर्याय भरता येऊन एका क्लिकवर बदल्या होतात. यामुळे सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासन बदली प्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे राबवत आहे, बदली प्रक्रिया व्यवस्थित पार पडत आहे. यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील वाडी-वस्तीवरील, दूरदूरच्या, ग्रामीण/खेडेगावातील, दुर्गम-डोंगराळ भागातील अवघड क्षेत्रामध्ये असलेल्या अनेक वर्षांपासुन बदली प्रतिक्षेतील  प्राथमिक शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण होत आहे. होत असलेल्या या बदल्यामुळे सामान्य शिक्षकातून समाधान व्यक्त होत आहे.
   बदलीपात्र शिक्षकांच्याही प्रशासकीय, विनंती बदली प्रक्रिया  होतं असल्यामुळे शहराजवळील, सुगम क्षेत्रातील शिक्षक बदलीस विविध मार्गाने , विविध कारणाने विरोध करतांना दिसतात.
 मा.मुंबई उच्च न्यायालयात संचमान्यता बाबत याचिका आहे, या याचिकेचा जिल्हाअंतर्गत बदल्यावर परिणाम होवू शकतो म्हणून या मध्ये स्वराज्य शिक्षक  संघटनेने  हस्तक्षेप याचिका  IAST no. 25647/2025 दाखल केली आहे ,
या  हस्तक्षेप याचिकेद्वारे ऑनलाइन बदल्याबाबत संघटना भूमिका मांडणार आहे.
अशी माहिती गजानन पांचाळ राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिली. शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने, शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे राज्य अध्यक्ष स्वराज शिक्षक संघटना गजानन पांचाळ, अवघड कृती समिती- अक्कलकुवा व धडगाव, अवघड क्षेत्रातील शेकडो शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post