शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून संपूर्ण राज्यात इ.११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाद्वारा राबविण्यास सुरुवात झालेली आहे. आज तगायत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झालेल्या असून अद्यापही जळगाव जिल्ह्यातील कुठल्याही उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येइतके प्रवेश झालेले नाही. विशेषतः कला शाखेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत नगण्य असल्याने असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झालेली आहे. आजपर्यंतच्या तीनही फेऱ्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या दिली जात असल्याने इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल की नाही याची धास्ती विद्यार्थी आणि पालक वर्गात निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर अपूर्ण विद्यार्थी संख्येमुळे वर्गाध्यापनास नेमकी कधी सुरुवात होईल याविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गामध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. प्रत्येक फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया भाग दोन भरावा लागत असल्याने बहुसंख्य विद्यार्थी सायबर कॅफेवरून सदर अर्ज करत असल्याने त्यांना दरवेळी सायबर कॅफे चालकास शुल्क द्यावे लागत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना या संदर्भातील पुरेशी माहिती नसल्याकारणाने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. असंख्य पालकांना आपला रोजगार बुडवून निव्वळ आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी वारंवार उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. सदर प्रवेश हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आहेत की शालेय शिक्षणाचे आहेत असा प्रश्न पालकांना निर्माण झालेला आहे त्यामुळे प्रत्येक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील यापुढील रिक्त जागांवरील संवर्गनिहाय प्रवेश तसेच संवर्गाची संख्या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित खुल्या वर्गातील प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांना देण्यात येऊन इ.११वीची प्रवेश प्रक्रिया सुकर करण्याची मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.नंदन वळिंकार,प्रा.सुनील सोनार, प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी. पाटील, प्रा.शैलेश राणे, डॉ.अतुल इंगळे, प्रा.पी.पी. पाटील,प्रा.मनिषा देशमुख, उपप्राचार्य प्रा.संजय पाटील, प्रा.डी.वाय.पाटील, प्रा.राजेंद्र चव्हाण,प्रा.दिलराज पाटील, प्रा.गजानन देशमुख, प्रा. अर्जून मेटे,प्रा.प्रवीण पाटील, प्रा.धनराज भारुडे,प्रमोद लोंढे,प्रा.व्ही. व्ही.पाटील, डॉ.सी.वाय. पाटील,प्रा.विवेक पाटील,मलिक शरीफ यांच्यासह संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने आदरणीय श्रीमती कल्पना चव्हाण (शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प.जळगाव) यांच्याकडे केलेली आहे. तसेच तशा आशयाची मागणी लेखी निवेदनाद्वारे पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार सर्वश्री. विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, किशोर दराडे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे केलेली आहे.
Tags:
शैक्षणिक