. नवापूर सत्यप्रकाश न्युज
सायबर गुन्हे व त्यांचे स्वरूप यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यांचा बिमोड करण्यासाठी संघटित प्रयत्न गरजेचे असल्याचे मत भारतीय रिझर्व बँकेचे लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी व्यक्त केले.
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तथा भारतीय रिझर्व बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय जागरुकता या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक होते. उद्योजक शितलबेन वाणी यांनी उद्घाटन केले. रिझर्व्ह बँकेचे मुंबई येथील सहाय्यक प्रबंधक ए.हरिकेश व सुरज सिंग, सहाय्यक विजय जाधव, भारतीय स्टेट बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक संतोषकुमार सोनी, नवापूर शाखा व्यवस्थापक अतुल देबाटे, बॅंक ऑफ महाराष्ट्र चे जळगांव विभागीय मुख्य प्रबंधक रिषिकेश घोरपडे, शाखा व्यवस्थापक परमार, संस्थेचे कोषाध्यक्ष आरीफभाई बलेसरिया, संचालक कासीमभाई मुल्ला, दिलीप पवार, नुरजी वसावे, पंचायत समिती सदस्या ललिता वसावे, नवापूर मर्कन्टाईल बॅंकेचे संचालक रशिदभाई टिमोल, व्यापारी राजुभाई नाथुलाल अग्रवाल, हाजी मुसाजीभाई बलेसरिया, मार्च शैक्षणिक संस्थेचे मानद सचिव अनिल भाई पाटील, ॲड अनिल शर्मा, ॲड रोशन नाईक, जिमी सेठ, शहरातील सनदी लेखापाल, व्यापारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
लायझनिंग अधिकारी आकाश काबरा यांनी मार्गदर्शन करतांना पुढे सांगितले की, लोकप्रतिनिधी किंवा मित्र व नातेवाईक यांच्या नावाने व ते अडचणीत आहे या आशयाचे फोन करून रक्कम हडपण्याचे प्रयत्न अलिकडे वाढले आहे. अश्या प्रसंगी भावनिक न होता सजगतेने असे प्रयत्न कसे हाणून पाडले जाऊ शकतात या विषयी त्यांनी माहिती दिली. आज प्रत्येक घरातील व्यक्तींचे कुठे तरी बॅंकेत खाते असते. प्रत्येक खातेधारकांना विविध अडचणी व काही प्रसंगी फसवणुकीचा सामना करावा लागतो. प्रत्येक ग्राहक हा राजा मानुन त्यांच्या पर्यंत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बॅंकांनी पुढे येऊन ग्राहकांची सेवा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या उद्घाटक उद्योजक शितलबेन वाणी यांनी शहरात विविध बॅंकांच्या शाखांची स्थापना, विस्तार अश्या स्मृतींना उजाळा दिला. बॅंकेच्या व इतर सर्व व्यवहारात ग्राहकांची कशी फसवणूक होते याची माहिती देत त्याची कारणमीमांसा त्यांनी केली. भारतीय रिझर्व बँक आदिवासी भागात अशी कार्यशाळा घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 
कार्यशाळेच्या निमित्ताने उपस्थित भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी, शहर व तालुक्यातील उद्योजक व व्यावसायिकांचे स्वागत करुन भारतीय रिझर्व बँकेच्या मुंबई कार्यालयाने महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल आ. शिरिष नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आदिवासी भागात वित्तीय साक्षरता वाढीस येण्यासाठी व अलिकडे वाढीस आलेल्या सायबर गुन्हे प्रकरणांना रोखण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चित लाभ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक ए.हरिकेश व सुरज सिंग यांनी चित्रफित च्या माध्यमातून ग्राहकांची हक्क व कर्तव्यांची माहिती देत फसवणूक, गैरप्रकार व इतर अडचणीत ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडून कशी मदत, सल्ला व सहाय्य प्राप्त होऊ शकते, त्यासाठी करावयाची उपाय योजना या विषयी माहिती दिली.
दुपारच्या सत्रात शहरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षक तथा कर्मचारी यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.
कार्यशाळेच्या दोन्ही सत्रात आकाश काबरा, स्टेट बँकेचे संतोषकुमार सोनी, अतुल देबाटे व बॅंक ऑफ महाराष्ट्रचे रिषिकेश घोरपडे यांनी व्यापारी, विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यशाळेत शहरातील व्यापारी, सनदी लेखापाल, डॉक्टर, वकील, व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिपक जयस्वाल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुरेखा बनसोडे व प्रा. नम्रता गामीत यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मंदा गावीत व प्रा. अनिल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
Tags:
सामाजिक