खाजगी प्रवासी बसेसची तपासणीसाठी
23 ऑक्टोंबर पर्यंत विशेष मोहीम ......नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील खाजगी प्रवासी बसेसची तपासणीसाठी 23 ऑक्टोंबर 2022 पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
या तपासणी मोहीमेत विना परवाना किंवा परवान्याच्या अटींचा भंग करुन चालणाऱ्या बसेस, अवैधरित्या मालवाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसणे, वाहनामध्ये बेकायदेशीर फेरबदल इत्यादी बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 9 ऑक्टोंबर पासून राबविलेल्या मोहिमेत आतापर्यंत 103 बसेसची तपासणी करण्यात आली असून त्यात दोषी आढळलेल्या 68 बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत 20 हजार दंड वसूल करण्यात आला आहे. तरी सर्व खाजगी बस धारकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन करुन प्रवाश्यांची सुरक्षितपणे वाहतूक करावी असे आवाहन श्री. बिडकर यांनी केले आहे.
0000
Tags:
शासकीय