नंदुरबार, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र व राज्य शासनाच्या कृषि विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (प्रमाणित बियाणे वितरण) व कृषि उन्नती योजना (ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी 1 हजार 143 क्विंटल हरभरा व 725 क्विंटल गहू या पिकाचे प्रमाणित बियाणे अनुदान उपलब्ध करुन दिले असून शेतकऱ्यांनी या अनुदानीत बियाणे योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर तसेच महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बी. जी. कोटकर यांनी केले आहे.
प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत पाच एकर व ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम या योजनेअंतर्गत एक एकर बियाणे अनुदानावर देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत राजविजय- 202, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी 1109 (पिडिकेव्ही कांचन), एक एकरसाठी लागणारे बियाणे 20 किलो बियाण्यावर 500 रुपये अनुदान तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा 900 राहील.
कृषि उन्नती योजना (ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम) हरभरा दहा वर्षाच्या आतील वाण बियाणे राजविजय-202, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी-1109 (पिडिकेव्ही कांचन) एक एकरसाठी लागणारे 20 किलो बियाण्यावर 500 रुपये अनुदान तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा 900 राहील. बिडिएनजीके-798(काबुली) साठी एक एकरसाठी लागणारे बियाणे 30 किलो बियाण्यावर 750 रुपये अनुदान तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा 2 हजार 550 राहील.
हरभरा दहा वर्षांच्या वरील वाण बियाणे जॅकी-9210, विजय, दिग्विजय- एक एकरसाठी लागणारे बियाणे 20 बियाण्यावर 400 रुपये अनुदान तर शेतकरी हिस्सा 1 हजार 20 राहील.विशाल वाणासाठी 20 किलो बियाण्यासाठी 400 रुपये अनुदान तर शेतकरी हिस्सा 1 हजार 40 राहील. विराट वाणासाठी 30 किलो बियाण्यासाठी 600 रुपये अनुदान तर शेतकरी हिस्सा 2 हजार 700 राहील.
गहु दहा वर्षांच्या आतील वाण बियाणे फुले समाधान, एमएसीएस-6478, पिडीकेव्ही सरदार,डिबीडब्लू-168 साठी एक एकरसाठी 40 किलो बियाण्यासाठी 600 रुपये अनुदान तर शेतकरी हिस्सा 1 हजार राहील. गहु दहा वर्षांच्या वरील वाण बियाणे लोकवन, जीडब्ल्यु-496, फुले नेत्रावती (एनआय अडब्ल्यु-1415), एमएसीएस-6222, एचआय-8663 (पोषण), एचआय-1544 (पूर्णा)- एक एकरसाठी 40 किलो बियाण्यासाठी 600 रुपये अनुदान तर 1 हजार 80 इतका शेतकरी हिस्सा असेल. हे बियाणे जिल्ह्यातील महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध करुन दिलेले असून शेतकऱ्यांनी सातबारा व आधार कार्ड देवून विक्रेत्यांकडून बियाणे प्राप्त करावे. अधिक माहितीसाठी कृषि विभागाशी संपर्क साधावा.