करदात्यांनी १५ डिसेंबर पूर्वी ॲडव्हान्स टॅक्स भरावा : हर्षद सदाशिव आराधी (अप्पर संयुक्त आयकर आयुक्त) यांचे आवाहन

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
  करदात्यांनी १५ डिसेंबर पर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा टप्पा भरावा व भविष्यात लागणाऱ्या व्याजापासून निश्चिंत व्हावे असे आवाहन अप्पर संयुक्त आयकर आयुक्त हर्षद सदाशिव आराधी यांनी केले.
      टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद यांच्यासोबत आयकर कार्यालय, गडकरी चौक येथे प्रधान आयुक्त शिवराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या बैठकीत हर्षद आराधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, करदात्यांनी ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरावा याकरिता आयकर विभागातर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. करदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांचा ॲडव्हान्स टॅक्स दिलेल्या मुदतीत भरून कर दायित्वाची जबाबदारी पूर्ण करावी. ॲडव्हान्स टॅक्स करदात्यांने एकत्रित न भरता प्रत्येक तीमाहिती भरायचा असतो. त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यात पहिला टप्पा १५ जून, दुसरा १५ सप्टेंबर, तिसरा १५ डिसेंबर शेवटचा हप्ता १५ मार्च पर्यंत भरावयाचा आहे. त्यातील तिसरा टप्पा १५ डिसेंबर च्या आत भरायचा आहे. ज्या करदात्यांचे करदायित्व दहा हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्यांना ऍडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे असल्याने ॲडव्हान्स टॅक्स वेळेवर न भरल्यास करदात्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. तिसऱ्या टप्प्यासाठी फारच कमी दिवस शिल्लक असल्याने व्यावसायिक व उद्योजकांनी त्यांच्या आर्थिक उलाढालीनुसार करदायित्व अदा करून राष्ट्र विकासासाठी योगदान वाढवावे जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा राष्ट्रीय धोरण व सार्वजनिक विकासासाठीच होणार असल्याची माहिती यावेळी हर्षद आराधी यांनी दिली. 
   करदात्यांनी आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नावर वर्षाच्या शेवटी आयकर भरावा लागत असतो परंतु करदात्यांना एकाच वेळी मोठ्या कराच्या रकमेचा बोजा सहन करावा लागू नये याकरिता आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत त्यात ॲडव्हान्स टॅक्स ही तरतूद करण्यात आली आहे. तरी सर्व करदात्यांनी वेळेत कर अदा करावा असे आवाहन यावेळी कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी केले. 
   यावेळी आयकर अधिकारी दत्ता दळवी, संजय सिंग, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनवणे, राजेंद्र बकरे,योगेश कातकाडे,सुनील देशमुख, जयप्रकाश गिरासे, रंजन चव्हाण, नितीन फिरोदिया, प्रकाश विसपुते, निखिल देशमुख आदींसह नाशिक मधील करसल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post