राज्यात 19 में पासून होणार इयत्ता 11वी प्रवेशाला ऑनलाईन सुरूवात

.  मुंबई सत्यप्रकाश न्यूज 
    राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करता येणार असून विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया येत्या 19 मे पासून सुरू होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी शिक्षण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. (11th Admission Process,11th admission update).   
   राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025-26 शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाइन अर्ज भरूनच अकरावीला प्रवेश मिळणार आहे. राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार 8 मे पासून संकेतस्थळ सुरू होणार होते. परंतु, काही अडचणीमुळे 8 मे रोजी ते सुरू होऊ शकले नाही. शुक्रवार दि .9 मे पासून संकेतस्थळ कार्यान्वित झाले असून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी अकरावी प्रवेशासाठीचे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाते. त्यात ऑनलाईन प्रवेश अर्जासाठीचे दोन भाग असतात. पहिल्या भागात विद्यार्थी  वैयक्तिक माहिती भरतात. तर दुसऱ्या भागात प्रवेशासाठी हव्या असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरतात. मात्र, यंदा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळांनी येत्या 15 मे पूर्वी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर 19 मे रोजी विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.शिक्षण विभागातर्फे https://mahafyjcadmissions.in अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी काही व्यक्तींनी राज्य शासनाच्या लोगोचा व शालेय शिक्षण मंत्र्यांच्या छायाचित्रांचा वापर करून एक बनावट संकेतस्थळ तयार केले. त्यात काही महाविद्यालयांची जाहिरात केली. त्यावर शिक्षण विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु,अद्याप शिक्षण विभागाकडून याबाबत कठोर भूमिका घेण्यात आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post