येथे प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, *दी एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कुल व शेठ एच. जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर* येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सव व पुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा* करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजयकुमार जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नवापूर एज्युकेशन सोसायटीचे निमंत्रित सदस्य श्री. परागभाई ठक्कर तसेच नवापूर शहराच्या माजी नगरसेविका श्रीमती मंगलाबेन विजयभाई सेन हे उपस्थित होते. शाळेच्या उप-मुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, उप-प्राचार्य श्री. नरेंद्र पाटील सर, पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे, पालकवर्ग व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सर्व विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून बँड पथकाच्या गजरात स्वागताने झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, प्रमुख अतिथी, उपमुख्याध्यापिका, उपप्राचार्य व पर्यवेक्षिका आणि शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या स्वागत व सत्कारानंतर विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजयकुमार जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, बौध्दिक व मानसिक विकासाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले व यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अशोक चौधरी सर यांनी केली. सूत्रसंचालन श्रीमती बीनिता शहा यांनी तर आभार प्रदर्शन श्री. गुफरान मनियार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री संजयकुमार जाधव सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
Tags:
शैक्षणिक