संत नामदेव महाराज : भक्ती, समतेचा आणि कीर्तनसंपन्न जीवनमार्ग

.    कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
    आपल्या भारतीय संतपरंपरेत संत शिरोमणी  नामदेव महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे. वारकरी संप्रदायाचे एक महान कीर्तनकार, भागवत धर्माचे खरे प्रचारक आणि हरिपाठाचे श्रेष्ठ लेखक म्हणून त्यांनी समाजाला भक्ती, समता आणि कार्यशीलतेचा संदेश दिला.
त्यांची पुण्यतिथी म्हणजे केवळ एक धार्मिक दिवस नाही, तर आत्मशुद्धी, समर्पण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची पुनःप्रचुर आठवण आहे.म्हणूनच तो "संजीवन समाधी सोहळा" आहे.
जीवन आणि भक्तीमार्ग :
संत नामदेव महाराज यांचा जन्म इ.स. १२७० च्या सुमारास महाराष्ट्रातील नर्सी नामदेव (ता. लोहा, जि. नांदेड) येथे झाला. त्यांचे वडील दामाशेट आणि आई गोणाई ही दोघंही वारकरी पंथाचे अनुयायी होते. लहानपणापासूनच नामदेवांचा वास श्री विठोबाच्या चरणी होता. त्यांच्या कीर्तनात प्रभूविषयीची निष्ठा आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम आढळतो.
भक्ती आणि समाजसुधारणा :
नामदेव महाराजांनी भक्ती म्हणजे कर्मकांड नव्हे, तर आत्मा आणि परमात्म्यातील साक्षात नाते आहे, हे शिकवलं. त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद, धार्मिक अहंकार यांचा प्रखर विरोध केला. त्यांच्या कीर्तनातून आणि अभंगातून त्यांनी सर्व जाती-धर्माच्या माणसांना एकत्र आणले.
ते केवळ देवभक्त नव्हते, तर समाजभक्त होते. त्यांच्या अभंगांमध्ये विठोबावरील प्रेम व्यक्त होतं, पण त्यासोबतच समाजातील अन्यायाविरोधात प्रखर आवाजही उमटतो.
विठोबा – नामदेवाचे परमसखा :
“हाचि हा मजा पाहुणा विठोबा, वाळवंटी आला पंढरीचा राजा”
अशा ओळींतून संत नामदेवांचे विठोबाशी असलेले बालसुलभ, सख्य भावनांनी भरलेले नाते दिसून येते. त्यांनी विठोबाला घरचा पाहुणा मानलं, त्याच्याशी खेळलं, भांडलं आणि प्रेमाने वागलं. भक्तीमध्ये अशी सजीवता फक्त नामदेवांच्या लेखणीतच दिसून येते.
  उत्तर भारतातही प्रभाव :
संत नामदेव महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी भागांतही कीर्तन करून भागवत धर्माचं बीज पेरलं. गुरुग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथात त्यांच्या ६१ रचना आजही स्थान घेऊन आहेत. हा त्यांच्या कार्याचा व्यापक प्रभाव दाखवणारा ऐतिहासिक पुरावा आहे.
 समर्पण आणि सेवा :
  संत नामदेव महाराजांच्या जीवनातून आपल्याला शिकता येतं की,
भक्ती म्हणजे स्वतःचा "अहं" विसरून पूर्णपणे प्रभूच्या सेवेत झिजणं.
भेदभाव विरहित समाज घडवणं हेच खरे धर्मकर्म आहे.
आपले शब्द, वाणी, कृती आणि विचार यांचा उपयोग लोकांच्या हितासाठी व्हायला हवा.
संजीवन समाधी सोहळ्याचा अर्थ :
   संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी ही केवळ एक धार्मिक परंपरा म्हणून नव्हे, तर त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा दिवस आहे.
म्हणूनच या दिवशी आपण,हरिपाठ आणि अभंगवाणीचे सामूहिक पठण करावं.
समाजात समतेचा विचार रुजवावा.
जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीसाठी झटावं. युवापिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून द्यावी.
   “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग”
अशा ओळींतून आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणं, ही संत नामदेवांची अंतिम साधना होती. त्यांच्या पुण्यस्मृतीदिनी, अशा या संतकवीला विनम्र अभिवादन.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज की जय!
 शब्दांकन - नितीन दत्तात्रय डोंगरे
कोपरगाव

Post a Comment

Previous Post Next Post