धडगाव येथे अंगणवाडी सेविकांचे,प्रभावी पोषण शिक्षणावर प्रशिक्षण संपन्न......

नंदुरबार, दि.27 (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक बालविकास योजना आणि डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात 21 ते 23 जुलै,2022 या कालावधीत तीन दिवशीय अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकाचे प्रभावी पोषण शिक्षण संदर्भात प्रशिक्षण संपन्न झाले. 
 या प्रशिक्षणाला जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर संस्थेचे संतोष मोरे, प्रशिक्षण प्रमुख विनोद आडोकर, सीमा पाडवी, संदीप काकड, सपना पानपाटील, संदीप राजपूत, प्रीतेश पाटील, यमुना पावरा उपस्थित होते. 
   या प्रशिक्षण शिबीराची सुरुवात 19 जुलै रोजी डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथून जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी कृष्णा राठोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली होती. शिबिरात दुर्बल घटकातील 15 ते 49 वयोगटातील किशोरवयीन मुली, प्रजननक्षम गर्भवती व स्तनदामाता तसेच 6 ते 23 महीने वयोगटातील बालके त्यांचा पोषणआहार मध्ये व आरोग्यस्थितीत सुधारणा बरोबर पोषण परसबाग निर्मिती व त्याचे महत्व पटवून सांगणे इत्यादीबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.
  तसेच एनपीएलए पोषण शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या वीस बैठकापैकी पहिल्या सात बैठकाशी निगडीत उद्देशांना अनुरूप प्रशिक्षण दरम्यान दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी विविध खेळाच्या माध्यमातून जसे की एकीचे बळ, पवलांचा खेळ, गाव नकाशा, सुपोषित सेतु, गीत, गायन, समस्या चित्रण, नाटके संकल्पित सुपोषित गाव आदी माध्यमातून क्षमता बांधणी करून त्यांची माहिती देण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकाद्वारे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेण्यात आले आणि गाव पातळीवर या सात बैठकांचे कसे नियोजन करावे याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात अंगणवाडी सेविकाची पूर्व व अंतिम आकलन चाचणी घेऊन प्रशिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणात 83 अंगणवाडी सेविका व 23 अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post