नंदुरबार, दि.26 (जिमाका वृत्तसेवा) भारतीय डाक विभागाच्या वतीने राष्ट्रीयस्तरावर ‘ढाई आखर’ याशिर्षंकाखाली राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले असून यास्पर्धेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन धुळे डाक विभागाचे वरिष्ठ डाक अधिक्षक प्रतापराव सोनवणे यांनी केले आहे.
यास्पर्धेसाठी ‘माझ्या दृष्टीक्षेपातील 2047 चा भारत’ या विषयावर पत्रलेखन करावयाचे असून स्पर्धेकांना मराठी, हिंदी किंवा स्थानिक भाषेत पत्रलेखन करता येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दोन गटात विभागणी करण्यात आली असून वय वर्ष 18 पर्यंत एक गट व 18 वर्षांवरील एक गट करण्यात आला आहे. स्पर्धकांनी आपल्या पत्रात आपले नाव, पत्ता, वयाचा उल्लेख करावा. स्पर्धकांना पाकिटातून पत्र पाठविण्यासाठी 1 हजार शब्दमर्यादा आणि आंतरदेशीय पत्रासाठी 500 शब्दमर्यादा आहे.
राज्यस्तरावर निवडलेल्या उत्कृष्ठ पत्रासाठी प्रथम 25 हजार, द्वितीय 10 हजार व तृतीय 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईत. तर राष्ट्रीयस्तरावर निवडलेल्या उत्कृष्ठ पत्रासाठी प्रथम 50 हजार, द्वितीय 25 हजार तर तृतीयसाठी 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपले पत्र मुख्य पोस्टमास्तर,जनरल मुंबई 400001 यांच्या नावाने जवळच्या टपालपेटीत किंवा डाकघरात 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत पाठवावे.
00000