जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..........

नंदुरबार, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) :  मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 13 जुलै, 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट) पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
   नंदुरबार जिल्ह्यास हवामान विभागाने बुधवार 13 जुलै रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला असल्याने नागरिकांनी पाऊस पडत असल्यास घराबाहेर पडू नये, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनाचे पालन करावे. नदी, नाले काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पुलावरुन पाणी वाहत असल्यास पाहण्यासाठी नदी व पुलाजवळ गर्दी करु नये. जुन्या व मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीचा आसरा घेवू नये. नदीकाठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे. कोणतीही जिवीत हानी  व पशुहानी होणार नाही याबाबत नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post