आझादी का अमृत महोत्सवातंर्गत, महावितरणतर्फे ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव........

नंदुरबार, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत "उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य" पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सव कार्यक्रमाचे आज तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
  कार्यक्रमाला आमदार डॉ.विजयकुमार गावित, आमदार किशोर दराडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, आईपीडीएसचे उप महाप्रबंधक सुमित बन्सल, कार्यकारी अभियंता संजय पाटील, प्रकाश खाचणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उप कार्यकारी अभियंता अमोल गढरी, हेमंत बनसोड, सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
    आमदार डॉ. गावित यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे उदघाटन करण्यात आले. ते म्हणाले की केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकरी व नागरिकांसाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना (सौभाग्य योजना ), मुख्यमंत्री सौर कृषी योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, स्व.विलासराव देशमुख अभय योजना, कृषी पंप विज धोरण 2020 अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्यांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. आमदार श्री. दराडे यांनीही दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले.
   सहायक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांनी या योजनांची अन्य लाभार्थ्यांना माहिती द्यावी.
  महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.बोरसे म्हणाले की, केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत "उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य" पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे राज्यभर आयोजन करण्यात येत असून या महोत्सवांत जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत जिल्ह्यात मागील ८ वर्षात ऊर्जा क्षेत्रात झालेल्या भरीव कामांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जाक्षेत्रातील आव्हाने आणि सन २०४७ पर्यंतचे ऊर्जेचे असलेले नियोजन हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.
     यावेळी मान्यवराच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना,सौभाग्य योजना, महा कृषी पंप ऊर्जा अभियान, स्व.विलासराव देशमुख अभय योजना कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अशा योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवारंग फाऊडेशनच्या वतीने ‘वीज वाचवा-देश वाचवा’, तसेच यावेळी महावितरणच्या विविध योजनांची माहिती पथनाट्याद्वारे दिली. एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थींनींनी यावेळी देशभक्तीपर आदिवासी नृत्य सादर केले.
 ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सव कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे लाभधारकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या आणि मराठी भाषेत अनुवादीत केलेल्या लाभार्थ्यांची यशोगथा चित्रफीतीद्वारे यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आली. सुत्र संचलन व आभार प्रदर्शन चेतन मगरे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक तसेच लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post