नंदुरबार, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) : मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक जोडणे आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संग्रहित करणे व कायदा/नियमांमधील इतर सुधारणांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी एक ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, नायब तहसिलदार श्रीमती.आशा सोनवणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, मा. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्याअन्वये कलम 23 नुसार मतदारांना मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. तसेच मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी आता प्रत्येक वर्षाकरीता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर हा दिवस अर्हता दिनांक असेल.
प्रमाणिकरणाची मोहीम 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार असून याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांकडून नमूना 6 ‘ब’ अर्ज भरुन घेणार आहेत. त्याकरीता सर्व मतदान केंद्रावर 4 सप्टेंबर 2022 व 11 सप्टेंबर 2022 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदारांकडून आधार कार्डची छायांकित प्रत व नमुना क्रमांक 6 ‘ब’ भरुन घेतील. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आणि आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने, पोर्टल व ॲपच्या माध्यमातून सुद्धा आधार क्रमांक प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात मतदार ऑनलाईन नमुना क्रमांक 6 ‘ब’ भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतो. तसेच मतदाराकडे असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओ.टी.पी द्वारेआधारची नोंदणी व प्रमाणिकरण करता येऊ शकते.
या शिवाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे घरोघरी भेटी देऊन मतदारांकडील छापील अर्ज क्रमांक 6 ‘ब’ द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक संकलीत करतील. आधार क्रमांक देणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. मतदारांच्या नोंदीला आधार क्रमांकाची यामुळे जोड मिळणार आहे. आधार संकलनाचा उद्देश विद्यमान मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणिकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. मात्र, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश भविष्यात मतदारांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. मतदार यादीतील कोणत्याही मतदाराने आधार क्रमांक व नमुना 6 ‘ब’ भरुन न दिल्यास मतदार नोंदणी अधिकारी मतदार यादीतील मतदाराची नोंद वगळणार नाही. तसेच कुठल्याही परिस्थितीत मतदाराचा आधार कार्डचा तपशिल सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही श्रीमती. खत्री यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार नोंदीशी प्रमाणिकरण करावे अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे नमुना क्रमांक 6 ‘ब’ भरुन देत आधार क्रमांक मतदान कार्डशी लिंक करावे असे आवाहनही श्रीमती. खत्री यांनी केले आहे.