पीएम किसान योजनेचे ई- केवायसीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे - जिल्हाधिकारी मनीषा खत्री.........

पीएम किसान योजनेचे ई- केवायसीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे -
जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार, दि.26 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 31 ऑगस्टपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी  यंत्रणेला दिले.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ई-केवायसी व ई -पीक पाहणी नोंदणी संदर्भात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कृष्णा राठोड, जिल्हा कृषी अधिकारी निलेश भागेश्वर आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवावी.  यंत्रणेने ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या गावनिहाय यादी उपलब्ध द्यावी. ई-केवायसीसाठी ग्रामसेवक, कृषी सेवक, कोतवाल,पोलीसपाटील यांनी गावपातळीवर लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना ई-केवायसीसाठी प्रवृत्त करावे. गावात दवंडी देऊन याबाबतची माहिती देण्यात यावी. तसेच पी.एस.किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या डाटाचे काम त्वरीत पूर्ण करावे. दररोज झालेल्या ई-केवायसीची गाव,तालुकानिहाय माहिती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 1 लाख 23 हजार 533 लाभार्थ्यांपैकी 64 हजार 308 लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे त्यात नंदुरबार 12 हजार 151, नवापूर 15 हजार 990,अक्कलकुवा 9 हजार 566, अक्राणी 3 हजार 101,तळोदा 8 हजार 642 तर शहादा 14 हजार 858 अशी माहिती यावेळी देण्यात आली.उर्वरीत लाभार्थ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले.
   शासनाने ई-पीक नोंदणीसाठी अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल अॅप व्हर्जन-2 ॲप सुरु केले असून शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करुन आपल्या पिकांची माहिती  15 ऑक्टोंबर पर्यत नोंदवावी. यासाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. बैठकीस सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सेवक उपस्थित होते.
0000

Post a Comment

Previous Post Next Post