जिल्हा वार्षिंक योजनेच्या कामांना त्वरीत मंजूरी घ्यावी =
नंदुरबार, दि.4 (जिमाका वृत्तसेवा) :
जिल्हा वार्षिंक योजनेतून होणाऱ्या विविध कामांना त्वरीत मंजूरी देवून सदर कामे गतीने पूर्ण होतील यासाठी नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक के.बी.भवर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, सन 2022-2023 करीता प्राप्त निधीचे तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव त्वरीत सादर करुन ते प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यंत्रणेने मागील वर्षांतील अपुर्ण कामासाठी लागणाऱ्या निधीची मागणी त्वरीत करावी. ज्या यंत्रणेचे जिल्हा वार्षिंक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास विकास कार्यक्रमांतर्गत प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्रे महालेखापाल कार्यालयास अद्यापही सादर केले नाही अशा विभागांनी ती त्वरीत सादर करावीत. ज्या विभागाचा निधी अखर्चित राहणार आहे त्यांनी अखर्चित निधी परत करावा. सर्व यंत्रणेने विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर, गाव पाड्यातील नवीन रस्ते, विद्युत कामांना गती देण्यात येवून त्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री.चौधरी यांनी जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना, तर श्री.नांदगावंकर यांनी अनुसूचित जाती उपयोजनातंर्गत उपलब्ध निधी व खर्चाची माहिती दिली. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
शासकीय