आई/वडील: रुख्मिणी/विठ्ठल पंत.
गुरु: श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी.
कार्यकाळ: १८९८-१९६८.
वाङ्मय: गुरु लिलामृत, दत्तबावनि, श्री गुरुमुर्ती चरित्र, गुरुचरित्र गुजराती मध्ये, वासुदेव सप्तशती अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये.
विशेष: नारेश्वर तीर्थ क्षेत्र वसवले, संपूर्ण गुजरात मध्ये दत्तसंप्रदायाचा प्रसार.
समाधी: १९ नोव्हेंबर १९६८, संवत २०२५च्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या मंगळवारी, दत्त चरणी हरिद्वारला देह ठेवला, अंत्येष्ठी व समाधी नारेश्वर येथे.
परमपूज्य श्री रंगावधूत स्वामी महाराज
जन्म व बालपण महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्र्वर तालुक्यात असलेल्या देवळे गावचे अबिगोत्रोत्पन्न पवित्र दशग्रंथी ब्राह्मण जयराम भट्ट यांचे तृतेय पुत्र विट्टलपंत वाळामे अणि त्यांच्या परमपत्नी रुक्मिणीबाई गुजराथमध्ये गोधरास्थित श्री विठ्ठल मंदिरात पुजारी म्हणून राहिले. या नवदांपत्याच्या घरी मिती कार्तिक शुद्ध नवमी, कुष्मांड नवमी संवत १९५५च्या सोमवारी ता. २१ नोव्हेंबर सन १८९८च्या पवित्र दिवशी प्रदोष समयी पंढरपूरचे स्वयं विठ्ठलनाथ भगवान पित्यास स्वप्नदृष्टांत देऊन प्रकट झाले आणि नवनाम धारण केले, पांडुरंग. हा दिवस सत्ययुगाच्या आरंभाचा दिवस होता. ते जन्मताच गोधऱ्यात पसरलेले भीषण अग्निकाण्ड शमून गेले. जगताच्या त्रिविधतापास शमविण्यासाठीच जणू या बालकाचा जन्म झाला, असे प्रकृतिमाता सुचवित होती.
श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामी गुजरातेत दत्तभक्तीची गोडी निर्माण करून श्रीक्षेत्र गरुडेश्वरी ब्रह्मस्वरूपी लीन झाले. ही दत्तभक्तीची परंपरा त्यांचे शिष्य श्रीरंग अवधूत महाराजांनी वाढीला लावून गुजराती जनतेच्या ह्रदयात अढळ स्थान मिळविले. ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ भजनाने अवघा गुजरात घुमू लागला. दत्तभक्तीचा सुगंध जिकडेतिकडे दरवळू लागला. पैसा, मान, किर्ती यापलीकडे देखील एक आनंददायी विश्व आहे, याची जाण अधिकाधिक गुजराती जनतेला होऊ लागली.
त्या श्रीरंग अवधूत महाराजांचे पूर्वाश्रमींचे नाव पांडुरंग विठ्ठल वालामे. श्रीमहाराजांचे वडील विठ्ठलपंत हे धर्मपरायण, वेदपरायण व दशग्रंथी विद्वान् ब्राह्मण. गुजारातेतील गोधरा या शहरात श्री. सखारामपंत सरपोतदार यांच्या विठ्ठलमंदिरात देवपूजेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ‘देवळे’ या गावाहून आले. विठ्ठल व रुक्मिणी या भाग्यशाली मातापित्यांच्या पोटी श्रीरंग अवधूत महाराज कार्तिक शुद्ध अष्टमीला गोपाष्टमीला जन्मले. (विक्रमसंवत १९५५)
श्री क्षेत्र नारेश्वर
बालपणापासूनच श्रीमहाराजांना जिज्ञासावृत्ती स्वस्थ बसू देईना, एकदा. दारावरून प्रेत चालले होते. वडिलांना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. शेवटचा प्रश्न होता, ही जन्ममरणाची उपाधी दूर होण्यास उपाय कोणता? वडिलांनी सांगितले, श्रीरामनामामुळे उपाधी दूर होते. श्रीमहाराजांनी मनाशी खूणगाठ बांधिली. श्रीरंग अवधूत महाराज गुजरातील लिहितात ---
‘नाममंत्र मोटो छे जगमां, जगम-मरण भूत जाय;
मुक्ति सुंदरी दौडी आसे आकर्षण एवूं थाय !
हरिना नामनो सौथी मोरो छे आधार ।’
दिव्य, तेजस्वी अशा या योगभ्रष्ट आत्म्याला पूर्वजन्माची अपूर्व साधना पूर्ण करण्याची तीव्र तळमळ लागली; ईश्वराच्या भेटीची उत्कंठा साधनेच्या पायऱ्या भराभर चढू लागली. पांडूरंग ५ वर्षांचे व धाकटे नारायण २॥ वर्षांचे असतानाच माता रुक्मिणीबाईच्या पदरात ही दोन बालके टाकून विठ्ठलपंत प्लेगला बळी पडून विठ्ठलचरणी विलीन झाले. पांडुरंग ८ वर्षांचे झाले. देवळे गावी व्रतबंध झाला. उपनयनविधीनंतर श्रीनृसिंहवाडीला श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या दर्शनाला आले. श्रीटेंबेस्वामी म्हणाले, ‘हा बाळ तर आमचाच आहे.’ हे शब्द ऐकताच पांडुरंगांनी कपडयासकट श्रीचरणांवर मस्तक अर्पण केले. मार्ग स्पष्ट झाला. साधनेला धार चढू लागली.
‘धाव धाव दत्ता किती वाहूं आता । चैन नसे चित्ता येई वेगी ॥’ असे आर्त स्वर निघू लागले.
आणि त्या करुणानिधान परमात्म्याला करुणा आली. कानी शब्द पडले. ‘पोथी पहा !’ मामांच्याकडे श्रीगुरुचरित्राची पोथी होती. त्याची अखंड पारायणे सुरू केली. मन शांत झाले.
श्रीरंग अवधूत महाराजांची बुद्धी तेजस्वी, स्मरणशक्ती तीव्र होती. मराठी, गुजराती, इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. पदरी लहान भाऊ, विधवा माता यांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. म्हणून बी. ए. ची परीक्षा दिली. काही काळ शिक्षकाची नोकरी पत्करली. पण मन रमेना. मूळची वृत्ती फकिरी.
तपोभूमी नारेश्वरकडे रवाना
धाकटा बंधू नारायण आता मातेचे पोषण करण्यास समर्थ झाला, हे पाहून रुक्मिणीमातेची आज्ञा घेऊन श्रीपांडुरंग आध्यात्मिक तपाकरिता घराबाहेर पडले.
तपसी छोड दिया संसार । जैसी सूकर विष्ठा भाई ।
तैसे भवसुख भुजमन आई । दत्त दिगंबर मन लुभाई ।
तपसी छोड दिया संसार ॥
वैराग्याने संतप्त झालेल्यांना शांत करणार्या नगाधिराज हिमालयाच्या कुशीत विसावण्याकरिता स्वारी विघाली. पण ईश्वरेच्छा बलीयसी ! कानांवर शब्द आले. ‘मागे फीर, मागे फीर.’ अर्थ कळेना. पण श्रीसदगुरुवासुदेवानंद सरस्वतींची इच्छाच ‘मागे फीर’ म्हणत होती. गुजरातेत अपूर्ण राहिलेले दत्तसंप्रदायाचे काम पूर्ण कर, हाच आदेश तो होता, आणि म्हणून साधक-मुमुक्षूंची माता नर्मदाबाई जिच्या दोन्ही तटांवर असंख्य तीर्थक्षेत्रे आहेत, अशा एका तीरी श्रीगणेशांनी जेथे श्रीशिवलिंग स्थापन केले आहे, अशा श्रीनारेश्वर क्षेत्री त्यांनी निवास केला.
एक साधू तपश्र्चर्या करण्यासाठी जागेच्या शोधात होता. त्यांस मार्गदर्शन करताना काही अधिकारी संतांनी सांगितले होते की, “बाळ, तू उपासनेसाठी नर्मदा किनारीच जागा शोधून काढ.”
तो साधू हिमालयात तपश्र्चर्येसाठी निघाला होता. तेव्हा त्याच्या कानात “मागे फिर, मागे फिर” असे शब्द ऐकू आले. ही आपल्या गुरूंचीच आज्ञा आहे. असे समजून तो मागे फिरला. हिमालयाच्या कुशीत गेला नाही.
त्यांना एकाने नर्मदा किनारी नारेश्र्वराची जागा सुचवली. दोन-तीन व्यक्ती त्यांचेबरोबर त्यावेळी होते. त्या साधूस ही जागा पसंत पडली. त्याने आपल्या बरोबरच्या मित्रांना सांगितले की, “आज रात्रभर मी येथे राहतो. तुम्ही तुमचे घरी जा. ही जागा मला पसंत पडल्यास मी येथे वास्तव्य करीन. तुम्ही उद्या या. मी उद्या तुम्हाला निश्र्चित सांगेन.”
त्याची मित्रमंडळी आपल्या घरी परत गेली. तो साधू तेथेच मुक्कामास राहीला.
सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ती जागा भयानक होती. आजूबाजूच्या ८-१० गावांची स्मशानभूमी येथे होती. पिशाच्चांचे तेथे वास्तव्य होते. उंचच उंच वृक्षांतून सूर्यकिरणे क्वचितच दृष्टोत्पत्तीस पडत होती. रात्री तर भयंकर अंधार असायचा. उजेड नाही. खोली किंवा पर्णकुटी नाही. दिवसा ढवळ्यासुद्धा लोक येथे येण्यास धजत नसत. त्यांच्या असे लक्षात आले की, हिंस्त्र प्राणी, विंचू, इंगळ्या, पाणविंचू, मोर, सर्प इत्यादी तेथे राजरोस फिरत असावेत. या साधूने तेथे तशीच एक रात्र काढली. रात्री त्याला शंख फुंकण्याचे आवाज तेथे ऐकू आले. डमरूचे डम डम आवाज ऐकू आले. सुमधूर गायनाचा गंधर्वांचा कार्यक्रम चालू असून, त्यांचा उल्हसित करणारा आवाज, त्यांच्या कानावर ऐकू आला. साप-मुंगूस, मोर व साप हे जन्मजात शत्रू असलेले प्राणी तेथे गुण्यागोविंदाने एकत्र आनंदाने खेळत असलेले त्याला दिसले. मंदिरातील घंटेचे आवाज त्यास स्पष्ट ऐकू येत होते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून देखील त्या साधूने ठरविले की, आपण याच जागेवर तपश्चर्या करायची. येथेच उपासना, अनुष्ठान करायचे. दुसरे दिवशी त्याचे मित्र नारेश्वरी आले. त्यांना त्या साधूने सांगितले की, “मला ही जागा पसंत आहे. तपश्र्चर्येसाठी येथेच वास्तव्य करण्याचा माझा विचार आहे”.
मातृमंदिर नारेश्वर
विक्रम संवत १९८१ च्या मार्गशीर्ष महिन्याच्या हेमंत ऋतूचे दिवस, कडाक्याची थंडी, कृष्णपक्षाची अंधारी रात्र, अशा वेळी मियागामकडून कोरलकडे जाणाऱ्या गाडीतून मालोद स्टेशनवर (हल्लीचे नारेश्वर रोड) श्रीमहाराज उतरले. नारेश्वर हिमालयाची वाट चालू लागले. नारेश्वर शिवालयाचे समोर कडूनिंबाच्या झाडाखाली थांबले. नजर टाकली. काय होते तेथे? जेथे आज हजारो लोक उत्तम धर्मशाळेत राहतात, भोजनगृहात भोजत घेतात, नर्मदामाईच्या घाटावर स्नान करितात, रात्री विद्युतदीपांनी आसमंत उजळून जातो, अशा आजच्या नारेश्वरी ४५ वर्षांपूर्वी होते एक निबिड अरण्य ! जेथे दिवसा लोक जावयास भीत, ते होते आजूबाजूच्या गावांचे स्मशान ! मोठमोठी वारूळे, विषारी सर्प, विंचू , हिंस्र पशू यांचा वास असे ! नर्मदामाईच्या किनाऱ्यावर जावयास साधी पायवाट्देखील नव्हती. अशा निवासाचा लोभ त्यांना जडला.
नियमितता, प्रामाणिकता आणि तेजस्विपणाच्या प्रखर लखलखाटामुळे महात्मा गांधी आणि काका कालेककरांसारख्या अनेक महानुभवांचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. वारंवर स्वास्थ्य बिघडत असतानाही लोकसंग्रहार्थ जीवन समर्पित करण्यासाठी २०व्या वर्षी गृहत्याग केला. साधनेसाठी एकांत स्थळाच्या शोधात निघाले. मार्गात तीन संतांचा संपर्क झाला. त्यांनी नर्मदाकिनारी स्थिर होण्याचा आदेश दिला आणि १९२५ च्या डिसेंबर महिन्यात संवत १९८२च्या मार्गशीर्ष वद्य चतुर्थीस ब्रह्मचारी पांडुरंगानी (बापजी) नारेश्र्वरात आसन स्थिर केले. नारेश्र्वराच्या निबिड जंगलात जेथे हिंसक पशूंचे भय आणि पिशाच्चयोनीचा त्रास होता, तेथे साधना काळाच्या प्रारंभी अनेक अडचणी सहन करून नर्मदातीरी मांडी ठोकून भूमी हलवून टाकली आणि सात गावांच्या स्मशानास नंदनवनाप्रमाणे सिद्ध तपोभूमीत रूपांतरित केले. ज्या निंबवृक्षाखाली चाळीस वर्षापर्यंत रक्ताचे पाणी करून तपश्र्चर्या केली आणि उघड्या डोळ्यांनी भगवान श्री दत्तात्रेयांचा साक्षात्कार प्राप्त केला, त्या निंबाने स्वत:चा कडूपणा सोडून तो मधुर झाला आणि खाली झुकून त्याने जमिनीला स्पर्श केला. परमपूज्य श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराजांनी केलेल्या स्वप्नादेशानुसार दत्तपुराणाच्या १०८ पारायणांचे अनुष्ठान पूर्ण करून त्यांच्या उद्यापन रूपाने १०८ दिवसांत पायी श्रीनर्मदामैय्याची परिक्रमा केली. गृहत्यागानंतर अवधूतजींनी (बापाजी) कधीही द्रव्यास स्पर्श केला नाही आणि चुकूनसुद्धा जर कोणी त्यांच्यासमोर पैसे ठेवले तर ते स्वत: उपवास करीत. कधीही भाषण प्रवचन न करणे, प्रचार न करणे आणि देवाचे कार्य देवच करतो, “श्र्वासे श्र्वासे दत्तनाम स्मरात्मन् न मातु: परदैवतम् भक्तीर्दम्भी विना भावम् परस्परदेवो भवम्” सारख्या अनेक उच्च सिद्धांतांना जीवनात उतरवून दाखविले. स्वत: उच्च कोटीचे सिद्ध संत असूनही स्वत:च्या आईच्या आज्ञेशिवाय पाऊल उचलत नसत, मातेच्या स्मृतिप्रीत्यर्थ नारेश्र्वरात मातृस्मृतिशैल स्मारकाची रचना केली. गुजराथमध्ये दुसरे मातृतीर्थ उभे केले.
श्री नारेश्वर पालखी सोहळा
श्री रंग अवधूत स्वामींचे कार्य
अवधूतजींनी नारेश्र्वर आश्रम संपूर्णपणे वैदिक परंपरेचा ठेवला आणि निष्कामभक्तीचा मूक प्रचार केला. अनेक नास्तिकांना आस्तिक केले, कित्येकांची घरे केली, कित्येकांची घरे भंगताना वाचविली, कित्येकांना आधिव्याधि उपाधीमधून मुक्त केले, कित्येक आंधळ्यांचे डोळे आणि पंगूंची काठी झाले, कित्येकांची व्यसने सोडविली, कित्येकांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आरूढ केले. जिज्ञासू भक्तांचे पथदर्शक झाले. कित्येकांना दृष्टिमात्राने ज्ञानाची दिशा दिली, कित्येकांची जीवने सुधारलेली, कित्येकांचे मरण सुधारले, कित्येकांना असाध्य जीवघेण्या रोगांमधून वाचवून जीवनदान दिले. अनेक स्त्रियांना संतानप्राप्ती करवून वांझपणाच्या टोमण्यातून वाचविले. त्यांची प्रेरणा आणि आशीर्वादाने कित्येक डॉक्टर, इंजीनिअर, प्राध्यापकांनी अनेक सिद्धींचे सोपान सर केले. राजा किंवा रंक, अबुद्ध किंवा ज्ञानी सर्वांनाच त्यांनी भक्तीच्या रंगाने रंगविले. अवधूतजींचे उपास्य दैवत भगवान दत्तात्रेयांची लीला ग्रथित करणारा १९००५ दोह्यांचा एक महाकाव्यासारखा वरद आणि औपासनिक ग्रंथ श्रीगुरुलीलामृताची रचना करून आपल्याला मृत तत्त्वातून अमृत तत्त्वाकडे जाण्याची उपासना दिली आणि प्रत्यक्ष जीवन जगण्याची कला शिकविली. या महान पवित्र ग्रंथाचे पाठ पारायण नियमितपणे करून अनेक लोक स्वत:चे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधत आहेत.
अवधूतजी संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी अनेक देवदेवींच्या प्रार्थनेची स्तोत्रे आणि संकीर्तने संस्कृतात रचली जी ‘रंगहृदयम्’ नावाने ग्रंथस्थ झाली. त्यांचे अनेक साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांच्या साहित्यात वेदान्ताचे तत्त्वज्ञान भरपूर भरलेले असूनही सामान्य मनुष्य या साहित्याचा आनंद घेऊ शकेल अशी अद्भुत सरलता त्यात आहे.
संवत १९९१च्या माद्य शुद्ध प्रतिपदेस सोमवारी ता. ४/२/१९३५ रोजी उत्तर गुजरातच्या कलोल तालुक्याच्या सईज गावी स्मशानाजवळील सिद्धनाथ महादेवांच्या मंदिरात श्री. कमलाशंकर त्रिपाठी नावाच्या एका भक्ताच्या धर्मपत्नी सौ. धनलक्ष्मीबाईना पिशाचपीडेतून मुक्त करण्याच्या अवधूतजींनी ५२ ओळींची जी स्तुती रचली तीच आपली श्रीदत्तबावनी. खरोखर तर सौ. धनलक्ष्मीबाई निमित्त करून अवधूतजींनी समस्त मानवजातीवर अहुतकी कृपा वर्षाविली आहे आणि आपल्याला हे अमोघ संकटविमोचनस्तोत्र प्राप्त झाले जे आज श्रीरंगपरिवारात आधि-व्याधि-उपाधीच्या निवारणासाठी दत्तबावनी निश्र्चितपणे फलदायी स्तोत्र ठरले आहे.
अवधूतजींनी उत्सव साजरे करण्यास नवी दिशा दिली. स्वकष्टार्जिताचा आनंद कसा असतो त्याचा अनुभव करविला. स्वत:च्या तन, मन, धनास देवचरणी स्वेच्छेने समर्पित करून कोणासमोरही हात पसरल्याशिवाय मानवमेळे भरण्याच्या त्यांच्या शक्तीस राष्ट्रकवि झवेरचंद्र मेघाणीनीसुद्धा गौरविले. पैसा आणि प्रसादाचा संबंध तोडला. श्रीमंतांचे स्वागत झाले पाहिजे पण पैशाच्या लालचीने खुशामत होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन जेथे कुठे मुक्काम कराल तेथे समोरच्याचा विचार करून तो ज्या स्थितीत ठेवेल, त्या स्थितीस अनुकूल होऊन रहा, या नियमाप्रमाणे सर्वांबरोबर व्यवहार केला. राजाच्या महालाच्या साहेबीत जो आनंद तोच आनंद गरिबाच्या झोपडीतसुद्धा खरा असे स्वत: जगून समजावून दिले. पूज्य श्री रंगावधूत गुरुमहाराज म्हणजे परब्रह्माचे मूर्त स्वरूप. श्रोत्रिय, ब्रह्मानिष्ठा, शांत, सच्चिदानंदमग्न असूनही सामान्य मानवाबरोबर सामान्यासारखे होऊन राहिले.
जीर्ण शिवालयासमोरील निंबवृक्षाखालची भूमी हेच निवासस्थान! अनुष्ठानाला सुरुवात झाली. खाण्यापिण्याची काळजी त्या भगवंताला “तन की सुधि न जिसको, जनकी कहाँसे प्यारे?” परमसदगुरु श्रीवासुदेवानंदसरस्वती महाराजांच्या ‘श्रीदत्तपुराणाची’ अष्टोत्तरशत पारायणे पूर्ण झाली. उद्यापनास द्रव्य नाही. सद्गुरुची आज्ञा झाली, १०८ दिवसांत नर्मदा-प्रदक्षिणा पुरी कर, म्हणजे तप:प्रधान उद्यापन होईल.
नर्मदाप्रदक्षिणेचा निश्चय ठरला. पण कानांत शब्द घुमू लागले, ‘ब्रह्मचारी, तू दक्षिणेकडे जा.’ गुरुमहाराजांची आज्ञा मानून चालू लागले. इकडे श्रीवासुदेवानंदसरस्वतींचे मराठी चरित्र ‘गुरूमूर्तिचरित्र’ गुजराती शिष्य श्री गांडामहाराज यांनी लिहिले होते. त्यांना सांगितले. ‘तू काळजी करू नको; एक ब्रह्मचारी तुझ्याकडे येत आहे.’ दोघांना अंतरीची ओळरव पटली. मराठी प्रत शुद्ध करण्याचे काम अंगावर घेतले. बारा ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर येथून नर्मदा प्रदक्षिणेस सुरुवात झाली. रोज २५-३० मैल चाल होत असे. एकदा तर एका दिवसात ५६ मैल चालून गेले. ‘तेरो नाम ही गावत जाऊं, धाऊं रूप विशाल; कानोंमे तेरी ही चर्चा, और न शब्द विचार! मुर्दा बन के फिरूं जगतमें, सार खराब निहार! निर्विकार सदा नि:संगी, डरूँ न देखत काल!’ कशाची भिती, कशाची पर्वा, ना तहान, ना भूक! गूळपाणी हाच पोटाला आधार! बरोबरीचे लोक म्हणत. महाराज, कशाला हा कष्टप्रद प्रवास करता आहात? महाराज म्हणत, मला तर कष्ट वाटतच नाहीत; जिकडे तिकडे आनंदच आनंद भरून राहिलेला दिसतो. नर्मदाप्रदक्षिणा म्हणजे दिव्यच आहे. एकदा बरोबरीच्या लोकांबरोबर चालले असताना लोक म्हणाले, ‘महाराज अस्वल आले.’ लोक घाबरले. महाराजांनी ‘गुरुदेव दत्त’ ही आरोळी ठोकल्याबरोबर अस्वल उडया मारीत निघून गेले.
पूर्वसंकल्पित श्रीगुरुआज्ञेप्रमाणे १०८ व्या दिवशी नर्मदाप्रदक्षिणा पूर्ण करून उद्यापनाची सांगती केली. यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे श्रीगांडामहाराजांनी लिहिलेला ‘श्रीगुरुमूर्तिचरित्र ग्रंथ’ संशोधन करून भडोच शहरी छापला, आणि तेथेच १०८ श्लोक असलेले ‘वासुदेवनामसुधा’ हे श्रीटेंबेस्वामींचे जीवनचरित्र संक्षिप्त रूपाने लिहिले. नारेश्वरी श्रीमहाराजांचा कीर्तिसुगंध दरवळू लागला. आर्त, मुमुक्षू यांची रीघ लागली. जंगलचे मंगल झाले. श्रीदत्तजयंतीकरिता हजारो लोक येऊ लागले. पण नारेश्वराला खरे महत्त्व प्राप्त झाले ते श्रीरंग अवधूत महाराजांच्या पूज्य मातोश्रींच्या करिता ! संवत् १९९२ मध्ये पू. मातोश्री नारेश्वरी राहण्यास आल्या. धाकटे बंधू नारायणराव हेही आजारी अवस्थेत नारेश्वरी आले. परंतु प्रभूची इच्छा निराळीच होती. नारायणरावांचा नश्वरदेह श्रीदत्तचरणी विलीन झाला.
Tags:
धार्मिक