दिवाळी म्हणजेच प्रकाशाचा पर्व सगळ्यांच्या मनाला उजळवून काढणारा उत्सव. सगळ्यांच्या मनात उत्साह निर्माण करणारा उत्सव. जुन्याला विस्मृतीत घालवून नव्या आनंदाला जन्म देणारा उत्सव. तसा हा सण शुद्ध भारतीय आहे म्हणजेच ओन्ली मेड इन इंडियाच. मात्र आता संपूर्ण जगाच्या पाठीवर जिथे भारतीय पोहचले तिथे हा प्रकाश पर्वही पोहचला आहे. दिवाळी, दीपावली, दीपावळी अशा अनेक नामकरणानी साजरा होणाऱ्या या सणाची निर्मिती कशी झाली हे अनेक भारतीय पौराणिक कथांमधून सांगितलेली आहेच. रामायण, महाभारतात तर या सणाचा आवर्जून उल्लेख केला आहेच. मनातील वामरुपी तमेचा अस्त होऊन नवप्रेरणेचा जन्म म्हणजेच दिवाळी. दुःख विसरायला लावणारा सण म्हणजे दिवाळी.
अगदी हातावर पोट असलेल्या पासून गडगंज संपत्ती असणाऱ्या धनिकापर्यंत सगळेच दिवाळी सण साजरा करतात. कारण मनाला व तनाला उत्साह देणारा हा सण आहे. कुणी बिनधास्त खर्च करून तर कुणी दिवाळं निघेल अशी परिस्थिती आली तरीही दिवाळी सण साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. मागील अनेक शतकांपासून हा पर्व सुरु आहे. दिवाळीची अगदी सुरुवात कधी झाली हे माहित नसूनही परंपरागत संपन्न होणाऱ्या या सणाबद्दल लिहावे तितके कमीच आहे. दरवर्षी हा उत्सव थोड्या अधिक वेगवेगळ्या वळणावर संपन्न होत असतो.
दोनेक वर्षांपूर्वी कोरोनामुळे अगदी रोडपतीपासून ते करोडपतीपर्यंत सगळ्यांनाच येनकेन प्रकारे फटका बसला. अनेकजण कोरोनामुळे उद्धवस्त झाले, अनेकांच्या संसाराला दुःखाची, वेदनांची साडेसाती लागली. अगदीच बरेच नोकरदार, व्यावसायिक आणि बऱ्याच अंशी कामगारवर्ग कोलमडून पडले. कुलूपबंद झालेल्या मानवीय जगण्यात हळूहळू बदलाव होत गेला, सक्तीच्या बेड्या हळूहळू सैल होत गेले परंतु असे होताना पाठीमागे वळून बघितल्यावर दिसणारा भयावह अंधार अजूनही उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. सांगा कसं जगायचं.... कण्हत कण्हत की गाणं म्हणत... तुम्हीच सांगा ही परिस्थिती प्रत्येकाचीच झाली होती. तरीही ही बुद्धीवादी मानव जात जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा... पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.. सारखी ताठर भूमिका बजावत जगण्याचा हट्ट सोडत नाही ही जमेची बाजू आहे.
कोरोनाच्या विळख्यातून आता कात टाकून आपण दोनेक वर्षांपासून दिवाळीतल्या प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करत आहोत. जुने जाऊद्या मरणालागुनी.... जाळुनी किंवा पुरून टाका म्हणत समोरचा आनंद द्विगुणित करत आहोत . माझीच कविता आज पुन्हा आठवली...
कुणी काहीही म्हटलं
तरी ही दिवा पेटला
अंधाराला जाळणारा
तो जवळचा वाटला
देश कुलूपबंदच
मात्र तमा तेजाळली
बंद झालेली माणसे
किती छान उजळली
अट्टहास नव्हताच
परिहास खूप झाले
कोठेतरी मनाच्याच
नकाराचे धूप झाले
एकजूट आहोतच
पुन्हा आता सिध्द झाले
कोरोनाला जाळायला
सारे कटीबद्ध झाले
लिहिण्यास कारण की
एकतेत शक्ती आहे.
सांगण्याची हीच नामी
एक नवी युक्ती आहे.
अंधाराला जाळणाऱ्या दीपोत्सवाची ज्योत सकारात्मक ठेवून पुन्हा या दीपपर्वाच्या औचित्यावर ऐक्याची मशाल पेटवूया.
शब्दांकन = आनंद घोडके, सोलापूर