कोपरगाव सत्यप्रकाश न्युज
सदैव हसतमुख,तल्लख विनोदबुद्धी, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तयार असणारे, हजरजबाबी,
उत्तम हस्ताक्षरासोबतच विविध विषयांचा अभ्यास असलेले, शांत तितकेच मनमिळाऊ, सर्वांवर प्रेम करणारे..
स्वावलंबी जीवन जगणारे.संपूर्ण जिल्ह्यात आणि पंचक्रोशीत सर्वाना परिचित व्यक्तिमत्व.
म्हणजे राहता येथील प्रख्यात
ग्रंथविक्रेते "डीयु मामा..."
एक भेटीत, मामा जणू कौटुंबिक सदस्य बनलेले.सर्वांची आस्थेने विचारपूस करणारे
वार्धक्यामुळे कुणावर अवलंबून रहायचे नाही असा विचार करून
मामा नुकतेच शिर्डीला वृद्धाश्रमात दाखल झालेले.७ नोव्हेंबर ला शेवटचा जन्मदिवस साजरा करून, आज १ डिसेंम्बर २०२३ रोजी,वयाच्या ८७ व्या वर्षी ईहलोकीच्या यात्रेसाठी निघून गेलेत.
विविध विषयांवरील पुस्तके,
ग्रंथ विक्री साठी राहाता येथील त्यांचे छोटेसे दुकान म्हणजे अनेक पत्रकार,साहित्यिकांचा अड्डाच जणू. त्यांचे जिवलग मित्र असलेले
श्री ऋषीपाठक, श्री लोंढे, डॉ.पीजी गुंजाळ,
पत्रकार सतिषभाऊ, अशी अनेक मंडळी सकाळी आणि विशेषतः सायंकाळी त्यांच्यासोबत हमखास दिसायची.
सुरुवातीचे चितळे रोड जवळील दुकान म्हणजे, पुस्तकांच्या गराड्यातून मामांचे तोंड तेवढे दिसायचे.मामांना कोणतंही पुस्तक विचारलं की मामा, त्या पुस्तकाचा लेखक, प्रकाशकाची माहिती सांगायचे..
साधारण पाच सात वर्षांपूर्वी पर्यन्त
बॅग मध्ये पुस्तके भरून ,मामा घरपोहोच पुस्तकांची डिलिव्हरी सुद्धा करीत असत..
पुस्तकाच्या माध्यमातून, मामांनी कोपरगाव, श्रीरामपूर, शिरडी,राहाता, संगमनेर अगदी प्रत्येक तालुक्यातील छोट्या मोठ्या नेत्यांपासून तर आमदार खासदार असोत नगरसेवक असोत, अनेक डॉक्टर्स, वकील मंडळींसोबत खूप मैत्रीचे संबंध
वाढवले, जोपासलेअनेकांच्या घरातल्या ग्रंथसंपदेमधील बहुतांशी पुस्तकांच्या पहिल्या पानावर अजूनही "डी यु जोशी: बुक सेलर" असा निळ्या शाईतला रबरी शिक्का आढळला की समजावे..ही व्यक्ती मामांची दोस्त आहे..
सायंकाळी सतिषभाऊ कडून मामांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली.
परिसरातील सर्वांसाठीच ते आदरणीय होते.. नियत वयोमानामुळे त्यांची प्राणज्योत मावळली असंच म्हणावं लागेल.
आजवरच्या सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कार्यामुळे ते सर्वांच्याच कायम स्मरणात राहतील.
आदरणीय डी यु मामा जोशी यांना सत्यप्रकाश न्युज व परिवारातर्फे
भावपूर्ण आदरांजली..
शब्दांकन - नितीन डोंगरे व सौ.नीता डोंगरे कोपरगांव
Tags:
सामाजिक