महाराष्ट्रातून देवदर्शनासाठी गुजरातमधील धार्मिक स्थळ असलेल्या सारंगपूर येथे जाण्यासाठी आता नंदुरबारकरांना थेट प्रवासी रेल्वे उपलब्ध झाली आहे. प्रायोगिक तत्वावर ही रेल्वे ९ ऑगस्टपर्यंत चार दिवस चालविली जाणार आहे. सिकंदराबाद-भावनगर अशी ही स्पेशल रेल्वे आहे.
नंदुरबार-बोरीवली हे साप्ताहिक रेल्वेगाडी आता भुसावळपर्यंत वाढविण्यात आली आहे. दर शुक्रवारी हे रेल्वेगाडी धावते. नंदुरबारपर्यंतच असल्याने प्रवासी संख्या देखील कमी होती. त्यामुळे ती गाडी आता भुसावळपर्यंत वाढविण्यात आली असून भुसावळहून सुटणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून हनुमान मंदिर तसेच स्वामी नारायण मंदिरासाठी गुजरातमधील सारंगपूर हे स्थान प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातून दररोज शेकडो भाविक सारंगपूर येथे दर्शनासाठी जात असतात. नंदुरबारहून तेथे जाण्यासाठी थेट रेल्वे नव्हती. त्यामुळे सुरत येथे जाऊन तेथून दुसरी रेल्वेने प्रवास करावा लागतो. परंतु आता नंदुरबारहून थेट रेल्वेगाडी उपलब्ध झाली आहे. या प्रवासी रेल्वेच्या ९ ऑगस्टपर्यंत अपच्या चार आणि डाऊनच्या चार फेऱ्या होणार आहेत. सिकंदराबाद ते भावनगर अशी ही रेल्वे आहे. भावनगर जाण्यासाठी ही रेल्वे नंदुरबार स्थानकात दुपारी साडेतीन वाजता येणार असून बोटाद (सारंगपूर) येथे पहाटे ३:०५ मिनिटांनी पोहचणार आहे.
नंदुरबारनंतर थेट सुरत, वडोदरा, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर, बोटाद असे थांबे आहेत. या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला तर ती कायमस्वरूपी सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Tags:
पर्यटन