कोपरगांव सत्यप्रकाश न्युज
सहकारी संस्थेच्या लेखापरिक्षकांनी, सहकार कायद्यासोबतच, सहकारी संस्थांना आवश्यक अनिर्वार्य झालेल्या विविध तत्सम कायद्यामध्ये अवगत होणे ही आत्ता काळाची गरज असून त्यासाठी, स्वतःला अपडेट करणे आवश्यक आहे असे मत नाशिक येथील तज्ञ करसल्लागार तथा अपिलेट व्यावसायिक श्री भूषण डागा यांनी व्यक्त केले.
राज्यातील प्रमाणित लेखापरिक्षकांसाठी कार्यरत असलेल्या, महाराष्ट्र ऑडिटर वेल्फेअर असोसिएशन आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लेखापरीक्षकांसाठीच्या मार्गदर्शनपर चर्चासत्रात ते बोलत होते.
प्रारंभी ऑडिटर कौन्सिल चे अध्यक्ष श्री रामदास शिर्के यांनी प्रास्ताविकात, सदर चर्चासत्राचा उद्देश तसेच राज्यातील ऑडिटर वेल्फेअर कौन्सिलच्या आजवरच्या कार्याची माहिती दिली.
प्रथम सत्रात पुणे येथील पोलीस कारागृह विभागात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ भाग्यश्री साळुंखे यांनी उपस्थितांना, माणसाच्या जीवनात निर्माण होणारे सध्याचे ताण-तणाव व त्याचे निराकरण या विषयावर उद्बोधक माहिती देताना, व्यक्तीने जीवनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या तणावाच्या परिस्थितीत कशा प्रकारे सामोरे जावे, व आपले वर्तन कसे ठेवायला हवे, यावर ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली.
सहकारी संस्थांना, आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणावर नोटिसा येत असून, बहुतांश प्रकरणांमध्ये आयकर विभागाने सहकारी संस्था, पतसंस्थांना कलम ८०पी नुसारच्या वजावटी अमान्य केल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी संस्थेने कोणती काळजी घ्यावयास हवी याबाबत तसेच,सहकारी संस्थेला आयकर कायद्यानुसार दाखल करावी लागणारी विवरणपत्रके, टीडीएस, तसेच आयकर व जीएसटी कायद्याचे संदर्भात पालन करावयाच्या जबाबदारीबद्दल लेखापरिक्षकांना श्री भूषण डागा यांनी पीपीटी च्या माध्यमातून सुरेख मार्गदर्शन केले. राज्यातील सहकार क्षेत्र खूप मोठे असून, ग्रामीण भागात सहकाराचा मोठा
विस्तार झाला आहे, सहकारी संस्थेमध्ये गृहनिर्माण, गृहतारण, मजूर, विकास सोसायट्या, पतसंस्था, कन्झ्युमर सोसायट्या यासारखे अनेकविध प्रकार बघावयास मिळतात. या मध्ये आयकर कायद्याचे कलम ८० पी नुसार कोणत्या संस्थांना आयकरात वजावट मिळते? कोणत्या संस्थांना आयकर विवरणपत्रक तसेच टीडीएस बाबतच्या तरतुदी लागू आहेत? त्यासाठी त्या संबंधित संस्थांनी कोणती काळजी घ्यावयास हवी, या बाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. सूत्र संचलन श्री प्रशांत शिर्के व श्री संदीप नगरकर यांनी केले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय श्री नितिन डोंगरे यांनी करून दिला तर, आभार प्रदर्शन श्री संजयजी घोलप यांनी केले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री भूषण डागा यांनी उत्तरे दिलीत,या चर्चासत्रासाठी श्री योगेश कातकाडे, ऍड.सतीश कजवाडकर, श्री प्रशांत शिर्के, श्री उमेश देवकर, श्री श्रीकांत चौगुले, श्री धनंजय शेळके, श्री भास्कर वाकोडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
संपूर्ण राज्यभरातून या चर्चासत्रासाठी मोठ्या प्रमाणावर प्रमाणित लेखापरीक्षक, कर सल्लागार हजर होते.
राज्यातील ऑडिटर वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष श्री रामदासजी शिर्के, तसेच नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री नितिन डोंगरे यांच्या एकत्रित प्रयत्नाने संस्था स्तरावरील हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी झाल्याचे मत कौन्सिल चे कार्य.सदस्यांनी व्यक्त करून, भविष्यात यासारखेच महत्वाच्या विषयांवर नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स असोसिएशन सोबत इतर उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
Tags:
करविषयक