तालुक्यातील सर्व ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवापूर तालुका ग्राहक मंच नेहमीच ग्राहकांच्या पाठिशी असुन सर्व समस्या सोडवण्यासाठी मंच प्रयत्नशील राहणार असे आश्वासन नवापूर तालुका ग्राहक मंच चे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधीरभाउ निकम यांनी उपस्थित असलेल्या तहसीलदार कार्यालयात संपन्न झालेल्या ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर आणि नवापूर तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने नवापूर येथील तहसिलदार यांच्या दालनात राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्राहकांनी महावितरण, कृषी उत्पन्न बाजार समिती आदींबाबत समस्या मांडल्या.
यावेळी निवासी नायब तहसिलदार पी. एस. मराठे, पुरवठा निरीक्षक दिलीप पाडवी, पुरवठा अव्वल कारकून सुनिता खिल्लारे, ममता वळवी, बकाराम गावित आदी उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अशासकीय सदस्यपदी नव्यानेच नियुक्त झालेले मंगेश येवले, अॅड. राखी गौड, नायब तहसिलदार मराठे, पुरवठा निरीक्षक पाडवी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवापूर तालुकाध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष हेमंत पाटील, सचिव महेंद्र चव्हाण, सदस्य डॉ. अर्चना नगराळे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जालमसिंग गावित आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्राहकांकडून समस्या मांडण्यात आल्या होत्या. विधितज्ञ राखी गौड यांनी ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली तर प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त मंगेश येवले यांनी ग्राहकांचे हक्क आणि प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगितले. अशासकीय सदस्य महाराष्ट्र सरकार
मंगेश येवले, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष सुधीर निकम, उपाध्यक्ष हेमंत पाटील आणि पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार तालुका प्रशासनाकडून करण्यात आला. वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुजीम शेख यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. कमलेश मोरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ६ टक्क्यांऐवजी १० टक्के कर वसुली केली जात असल्याबाबत तक्रार केली. सचिव महेंद्र चव्हाण यांनी ग्राहकानी आपले हक्क व जबाबदारी ओळखण्याचे आवाहन केले. ग्राहकांची फसवणूक कशी होते, याबाबत प्रत्यक्षात आलेले अनुभव कथन केले. याप्रसंगी डॉ. अर्चना नगराळे, हेमंत पाटील, प्रकाश खैरनार, मनोज बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हेमंत पाटील तर आभार तालुकाध्यक्ष सुधीर निकम यांनी मानले. यशस्वीतेसाठी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व ग्राहक मंचचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले.
Tags:
सामाजिक