महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दि. ११ फेब्रुवारी, २०२५ पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) ची तर दि. २१ फेब्रुवारी, २०२५ पासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) ची परीक्षा सुरु होत आहे. सदर परीक्षा कॉपीविरहीत वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे.
सदर अभियानाचा मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समावेश झाला असून मा. शिक्षणमंत्री महोदय, ना. दादाजी भुसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अभियान राबवले जात आहे. त्यासाठी दि.२० जानेवारी ते दि.२६ जानेवारी २०२५ या कालावधीत जनजागृती सप्ताहांतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्यमंडळ अध्यक्ष, मा. शरद गोसावी साहेबांनी सदर उपक्रमांचा आराखडा सर्व विभागीय मंडळांना पाठवला असून सदर जनजागृती सप्ताहात राज्य मंडळाने विहीत केलेले उपक्रम नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगांव व नंदुरबार जिल्हयातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांनी व कनिष्ठ महाविदयालयांनी राबवून कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मिती करावी असे आवाहन नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष, डॉ. सुभाष बोरसे, विभागीय सचिव, श्री. मोहन देसले, सहसचिव, मच्छिन्द्र कदम व सहाय्यक सचिव, श्रीम मंदाकिनी देवकर यांनी केले आहे.
Tags:
शैक्षणिक