नवापूर शहरातील इंग्रज कालीन वास्तू मधील असलेली नवापूर येथील जुनी तहसील कार्यालयाची इमारत सध्या नवापूर पोलिस ठाण्याच्या रूपात कार्यरत आहे. शासनाच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत या ऐतिहासिक इमारतीचा संपूर्ण कायापालट करण्यात आला असून, आता हे ठाणे एक सुशोभित, स्वच्छ आणि नागरी अनुकूल ठिकाण बनले आहे.
पोलिस ठाण्याच्या इमारतीला आकर्षक रंगरंगोटी करून झळाळी देण्यात आली आहे. आवारात सिमेंटचे ब्लोक बसवून परिसर अधिक टुमदार करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पोलीस स्टेशन आवार हिरवेगार करण्यासाठी पुढाकार घेत परिसरात लिंबासह विविध फुलझाडांची लागवड करून ठाण्याला बगिच्याचे रूप दिले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंटच्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, थंड पाण्यासाठी फिल्टर मशीन लावण्यात आले आहे. परिसरात स्वच्छतेसाठी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र ड्रम बसवले गेले आहेत.
प्रत्येक विभागास नावांसह दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिकांना मार्गदर्शन सुलभ होईल. तसेच पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर प्रथम दर्शनी मोठा बोर्ड लावण्यात आला आहे. पोलिस अधिकारी व अमलदार यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग शेडची निर्मितीही करण्यात आली आहे.
या संपूर्ण परिवर्तन प्रकियेत पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, भाऊसाहेब लांडगे, जितेंद्र महाजन, जगदीश सोनवणे, केशव गावीत, बळवंत वळवी व संपूर्ण पोलिस कर्मचारी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून नवापूर पोलिस ठाण्याचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलला गेल्याने आलेल्या नागरिकांकडून पोलिस विभागाचे कौतुक होत आहे.
Tags:
शासकीय