मा. जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या निर्देशानुसार नवापूर तालुक्यातील महसूल मंडळ मुख्यालये तसेच प्रमुख गावांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत एकूण १४ ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांद्वारे नागरिक व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकूण २१२५ सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिरांचे आयोजन तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच स्थानिक जनप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी अभियानाची उद्दिष्टे आणि नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा यांची सविस्तर माहिती दिली.
अभियानाअंतर्गत उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे, जमीन नोंदणी, वारस नोंदी, आधार नोंदणी व दुरुस्ती, शासकीय योजनांचे अर्ज, वृद्धापकाळ पेन्शन अर्ज, शिधापत्रिकेतील नाव समावेश/कपात, नवीन व दुबार शिधापत्रिका तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे अशा महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी, विनाअडथळा आणि कमी वेळात पूर्ण होऊ शकली. नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून, भविष्यात अशाच प्रकारचे शिबिरे वारंवार आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Tags:
शासकीय