राज्यातील अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी टप्पा वाढ मागणी संदर्भात पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय तरतूद न झाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध संघटनांनी मिळून स्थापन केलेल्या शिक्षक समन्वय संघा द्वारे जाहीर करण्यात आलेल्या दिनांक ८ व ९ जुलै रोजी च्या शाळा बंद आंदोलनास महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटने ने जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
संघटनेच्या राज्याध्यक्ष तथा शिवसेनेच्या राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षक समन्वय संघाला स्वतः आझाद मैदानावर जाऊन पाठिंबा दिलेला आहे व स्वतः या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 5 जून रोजी पासून आझाद मैदान मुंबई येथे सदरचे आंदोलन सुरू असून वर्षानुवर्ष तुटपुंज्या पगारावर किंवा बिन पगारी काम करणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकांना स्वतःच्या पगारासाठी वेळोवेळी आंदोलन करावे लागत आहे याची सरकारला कुठेही लाज वाटत नाही. किंबहुना गेल्या अधिवेशनाच्या वेळी तात्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतः आंदोलन स्थळी भेट देत शिक्षकांना टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते व त्यानुसार पावसाळी अधिवेशनात या शिक्षकांच्या पगारासाठी निधीची तरतूद होईल याची सर्वांना अपेक्षा होती. परंतु युती सरकारला सर्व काही कल्पना असताना देखील जाणून-बुजून या शिक्षकांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येत नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे व त्यामुळे गेल्या पाच तारखेपासून शिक्षक निधीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाला बसले असून यामध्ये महिला शिक्षिका देखील उपोषणाला बसलेल्या आहेत. या आंदोलनात स्वतः सहभागी होण्याचा शुभांगी ताई पाटील यांनी निर्णय घेतलेला असून राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांनी येत्या आठ व नऊ जुलै रोजी होणाऱ्या शाळा बंद आंदोलनात महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह सहभागी होणार असून केवळ अंशतः व विनाअनुदानितच नाही तर राज्यातील सर्व शिक्षकांनी व संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांनी या शाळा बंद आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन शिवसेनेच्या राज्य उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी केले आहे.
Tags:
शैक्षणिक