नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त, शेतकरी देखील चिंतेत

.   नवापूर - सत्यप्रकाश न्युज 
  येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नवापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाने काहीशी उसंत घ्यावी, अशी आर्त विनवणी शेतकरी करत आहेत. कारण खरीप हंगामातील पेरणीसाठी त्यांना आता कोरड्या हवामानाची प्रतीक्षा आहे. सततच्या पावसामुळे नवापूर तालुक्यातील रंगावली धरण 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे रंगावली नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था ही पावसाळ्यात एक मोठी समस्या बनली आहे. सततच्या पावसामुळे नवापूर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्यांसाठी चक्क आंदोलन ही करावे लागेल.
   सध्याचा पाऊस खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या मशागतीमध्ये अडथळा निर्माण करत आहे. पुरेसा पाऊस पेरणीसाठी चांगला असला तरी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाने थोडी उसंत घ्यावी आणि पेरणीसाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच शहरातील पाणी साचलेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. नवापुरमध्ये पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे 

Post a Comment

Previous Post Next Post