नवापूर (सत्यप्रकाश न्युज
क्रीडा क्षेत्रात नवापूरचा झेंडा पुन्हा एकदा उंचावणारी आनंददायी बातमी! दि एन.डी. अॅण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर* येथील इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी हर्ष मुकेश चावला याने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून नवापूरच्या क्रीडा इतिहासात एक नवे यशस्वी पाऊल टाकले आहे.
ही स्पर्धा 26 ते 29 जून 2025 दरम्यान हिंजवडी फेज वन, पुणे येथील विठ्ठल लॉन्स या ठिकाणी संपन्न झाली. किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, वाको इंडिया आणि इंटरनॅशनल कमिशन ऑफ ओलंपिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेतील के-वन स्टाईल प्रकारात सहभागी होत हर्षने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत आपल्या ताकदीचा ठसा उमठवला. तंत्र, ताकद आणि संयम यांचा उत्कृष्ट संगम साधत त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि अंतिम फेरीत धडाकेबाज विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राज्यस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर हर्ष चावला याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
हर्षच्या या यशामुळे संपूर्ण नवापूर तालुक्यात अभिमानाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री.विपीनभाई चोखावाला, उपाध्यक्ष श्री.शिरीषभाई शाह, कार्याध्यक्षा श्रीम.शितलबेन वाणी, कोषाध्यक्ष श्री.सतीशभाई शाह, सचिव श्री.राजेंद्रभाई अग्रवाल, सह-सचिव श्री.शोएबभाई मांदा व सर्व सन्माननीय पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय कुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीम.कमलबेन परीख, उप-प्राचार्य श्री.नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका श्रीम.निर्जलाबेन सोनवणे, पर्यवेक्षक श्री.जाहिद खान पठाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मित्रपरिवाराकडून त्याच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाळेच्या वतीनेही त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हर्षने यशाचे श्रेय आपल्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचा प्रोत्साहनपर आधार आणि पालकांचे अथक सहकार्य यांना दिले आहे.
Tags:
शैक्षणिक