नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड, 37 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह आरोपी नवापूर पोलीसांच्या ताब्यात......
नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
दिनांक 18/09/2022 रोजी रात्री 12/30 वाजता नवापूर शहरातील श्री. अभय मोहीते हे जेवण करुन त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा बंद करून झोपुन गेले होते. दिनांक 19/09/2022 रोजी सकाळी ते नेहमी प्रमाणे 06/30 वाजेचे सुमारास झोपेतून उठले. तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील पलंगावर व कपाटावर dri 37,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल त्यांचे राहते घराचे मागील बाजूस असलेला दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे 02 मोबाईल घरात नसल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली त्यांनंतर श्री. अभय राजु मोहीते वय 20 वर्ष रा. देवळफळी, नवापुर जि. नंदुरबार यांचे फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे येथे 482/2022 भा.द.वि. कलम 457,380 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश वाघ यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत माहिती मिळविली की, सदरची घरफोडी ही देवळफळी परिसरात राहणारा मोहीन आलवाला याने केलेली आहे त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून संशयीत आरोपी मोहीन आलवाला यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी देवळफळी परिसरात साध्या वेशात जावून सापळा रचून मोहीन आलवाला यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने मोहीन सलाम आलवाला वय 22 वर्ष रा. देवळफळी, नवापुर जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास श्री. अभय मोहीते यांचे घरातील चोरी झालेल्या दोन मोबाईल बाबत विचारपूस केली असता सुरवातीला तो उडवा उडवीचे उत्तरे देवू लागला नंतर त्यास नवापूर पोलीस ठाणे येथे आणून पुन्हा
विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील 37,000/ रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या 24 तासात उघड करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला म्हणून मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री निलेश वाघ, पोलीस हवालदार/ दादाभाई वाघ, पोलीस नाईक नितीन नाईक, विनोद पराडके, पोलीस कॉन्सटेबल संदिप सोनवणे यांचे पथकाने केली आहे.