नवी मुंबई : सत्यप्रकाश न्यूज
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने पात्र शिक्षकांची १ ऑक्टोबर २०२२ पासून पुन्हा मतदार नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, शिक्षक मतदार नोंदणी करताना बोगस मतदारांची नोंदणी होऊ नये यासाठी कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे यांची मंगळवारी कोकण भवन येथे भेट घेतली. तसेच शिक्षक मतदार नोंदणीमध्ये बोगस नोंदणी होणार नाही यासाठी दक्षता घेण्याची विनंती केली.
यावेळी कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपायुक्त रानडे यांच्यासोबत चर्चा करताना, मागील निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नोंदणी झाल्याची माहिती दिली. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये होणार निवडणुकीत देखील प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अशाच प्रकारे बोगस नोंदणी होण्याची शक्यता असल्याचे म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर उपायुक्त मनोज रानडे यांनी अशी नोंदणी करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन म्हात्रे व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच बोगस शिक्षक ओळखण्यासाठी शिक्षक पोर्टल व यू-डायसवरून माहितीची टॅली केली जाणार असल्याचे देखील शिष्टमंडळाला सांगितले.
Tags:
राजकीय