विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत
नंदुरबार, दि.1 (जिमाका वृत्तसेवा):
मा. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये सुधारणा केली असून मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी आता दरवर्षी चार अर्हता दिनांकावर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. तरी या मोहिमेत जास्तीत जास्त नवमतदारांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
मतदार यादी पुर्व- पुनरीक्षण कार्यक्रम असा: बुधवार 9 नोव्हेंबर पासून एकत्रीकृत प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करुन 9 नोव्हेंबर 2022 ते गुरुवार 8 डिसेंबर 2022 या कालावधीत नागरिकाकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरूस्ती वा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाच्या नोडल शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येईल या शिबीरात महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून 18 वर्ष पूर्ण झालेल्या परंतू मतदार नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांची यादी घेण्यात येईल व सदर शिबीरामध्ये विद्यार्थ्यांकडून नमुना-6 भरून घेण्यात येईल.
शनिवार 12 नोव्हेंबर 2022 व रविवार 13 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान केंद्रावर महिला, दिव्यांग यांच्या मतदान नोंदणीसाठी तसेच शनिवार 26 व 27 नोव्हेंबर 2022 या दिवशी मतदान केंद्रावर तृतीयपंथी व्यक्ती, देहविक्री करण्याऱ्या महिला आणि घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती यांच्या मतदान नोंदणीसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
26 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. तर 3 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्याची छपाई करण्यात येवून 5 जानेवारी 2023 रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तरी नागरिक व नवमतदारांनी मतदान नोंदणी, दुरुस्ती व वगळीचे अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
Tags:
शासकीय