अंमली पदार्थ मुक्त जिल्हा मोहिमेंतर्गत 17 लाख 74 हजार रुपये किमंतीचा तब्बल 2 क्विटल 53 किलो गांजा जप्त..!! स्थानिक गुन्हे शाखेची शहादा तालुक्यात धडक कारवाई

नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज                 येथील जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ मुक्त जिल्हा (Drugs Free District ) या संकल्पनेची सुरूवात करुन वर्षभरापासून नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया सुरु आहेत. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा भविष्यातही अंमली पदार्थ मुक्त राहिल यासाठी काटेकोरपणे लक्ष ठेवले जाईल, तसेच अंमली पदार्थांची लागवड, शेती, वाहतूक इत्यादीवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ड्रोन व इतर तंत्रज्ञानाचा वापर देखील केला जाईल. अंमली पदार्थ विरोधी कारवायांमध्ये अजून वाढ करुन जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाना थारा असणार नाही.तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, विसरवाडी, उपनगर या पोलीस ठाणे हद्दीला गुजरात राज्याची व शहादा, म्हसावद, धडगांव पोलीस ठाणे हद्दीला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहेत. आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक असल्याने अवैध दारुची वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, NDPS कारवाई इत्यादींवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या कडक सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. तसेच पोलीस ठाणे व जिल्हा स्तरावर विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून सदरची पथके अंमली पदार्थावर कारवाई करणेसाठी सतत विविध भागात फिरत असतात. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक थांबविण्यासाठी व जंगल परिसरात लपवून अंमली पदार्थांचा साठा शोधून काढण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणेबाबत दिलेल्या सूचनांनुसार ड्रोनचा वापरही केला जात आहे...
   दिनांक 02/11/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील नवानगर गावातील एका इसमाने त्याचे केळी पिकाचे शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे.नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांचे एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व त्यांचे पथक हे मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील नवानगर शिवारातील वडगांव ते नवानगर रस्त्यावर एका केळीच्या शेताजवळ आले. त्याठिकाणी केळीचे पीक असलेल्या शेताच्या बांधावर एक इसम हालचाली करत असल्याचे दिसुन आले. पोलीस त्याच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या इसमाने तेथून पळ काढला. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळून जाणाऱ्या इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास नाव गाव विचारले असता सुनिल मेरसिंग चव्हाण, वय-47 वर्षे, रा. नवानगर, ता. शहादा, जि. नंदुरबार असे असल्याचे सांगितले.
   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळीच्या पीक असलेल्या शेताची पाहणी केली असता आतील बाजुस हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांची लागवड केलेली व ठिकठिकाणी काही झाडे खोडापासून कापलेले एका ठिकाणी जमा करुन ठेवल्याचे दिसुन आले, म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपुर्ण केळीचे शेत पिंजुन काढले असता तेथे संपूर्ण शेतातून 2 क्विंटल 53 किलो 584 ग्रॅम वजनाचे 17 लाख 74 हजार 626 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आले. गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली, तसेच आरोपी नामे सुनिल मेरसिंग चव्हाण, वय-47 वर्षे, रा. नवानगर, ता. शहादा, जि.नंदुरबार याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 650/2023 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ आधनियम-1985 चे कलम 8(क), 20 (ब),(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
   सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश भदाणे, पोलीस हवालदार संदीप गोसावी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, मोहन ढमढेरे, विशाल नागरे, बापू बागल, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार विजय हिवरे, शोएब शेख, दिपक न्हावी, यशोदिप ओगले, हेमंत वारी, हेमंत सैंदाणे, उदेसिंग तडवी यांचे पथकाने केली. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.
 नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, तंबाखूजन्य व अमली पदार्थाचे सेवन केल्याने स्वास्थ्यावर दुष्परिणाम होवून विविध प्रकारचे आजार होतात तसेच अंमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे मनुष्याची आर्थिक, सामाजिक हानी होवून त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबीयावर होत असतो. तसेच आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून लांब राहून नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थमुक्त कसा राहिल यासाठी प्रयत्न करावे तसेच अंमली पदार्थ याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यास 9022455414 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावे हेल्पलाईन क्रमांकावर माहिती | देणाऱ्याचे नाव व पत्ता गोपनीय ठेवले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post