आयकराच्या पोर्टलवर आता करदात्याच्या विनिर्दिष्ट आर्थिक व्यवहारांची माहिती मिळणार - कर सल्लागार नितीन डोंगरे

 कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
    केंद्र सरकारच्या  अखत्यारीतील, प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांनी करदात्यांच्या सुलभतेसाठी आयकराच्या वेबसाईटवर नुकतेच काही महत्त्वाचे बदल, सुधारणा केल्याचे जाहीर केले आहे.
    हिशेबवर्षात करदात्याने केलेल्या विविध आर्थिक व्यवहारांच्या माहित्या, आयकर विभागाकडे एसएफटी म्हणजेच,विनिर्दिष्ट आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून त्या त्या शासकीय संस्था, पोस्ट ऑफिसेस, बँका, तालुका उपनिबंधक (नोंदणी), शेअर्स व्यवहार करणाऱ्या कंपन्या आदींकडून प्राप्त होत असतात. या सर्वच प्रकारच्या व्यवहारांचे बाबतीत मुळात आयकराची करकपात करवून घेण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणेकडून आयकर विभाग दरसाल ३१ मे पूर्वी अशी माहिती आपल्याकडे बोलावून घेत असते.अर्थात अशी माहिती आयकर विभागाला देणे हे डिडक्टर(म्हणजेच कर कपात करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेची) ची जबाबदारी असते. अशा संस्थांना त्यांचेकडे आर्थिक वर्षात झालेले विविध व्यक्ती, संस्थानी केलेल्या व्यवहाराबाबत विवरणपत्रकाच्या स्वरूपात आयकर विभागाकडे ही माहिती विहित मुदतीत सादर करण्याचे बंधन घालून दिलेले असते.
    आयकर विभाग अनेक वित्तीय संस्था, उपनिबंधक, बँका ई. यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीचे सुयोग्य पृथक्करण करून अशी माहिती, नंतर त्या त्या करदात्यांच्या, आयकर पोर्टल वरील वार्षिक माहिती पत्रकामध्ये नोंद करीत असते. 
याच वार्षिक माहितीपत्रकाला (एआयएस) असे म्हटले जाते. 
  करदात्याने आपले आयकर विवरणपत्रक दाखल करण्यापूर्वी, वेबसाईटवर दिसत असलेल्या एआयएस मधील माहिती,आपण दाखल करणार असलेल्या आयकर विवरण पत्रकाशी जुळते किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून पहाणे, करदात्याच्या दृष्टीने हितावह असते.  आयकर पोर्टल वरील एआयएस मध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, करदात्याशी संबंधित नसतील तर करदाता पोर्टल वर त्याबाबतीत आपले मत  मांडू शकतो. 
   करदात्यांच्या आयकर पोर्टलवरील एआयएस स्टेटमेंट मध्ये यापुढे करदात्यांशी संबंधित उत्पन्न व खर्चाचे बाबतीतील, सुमारे ५६ प्रकारच्या व्यवहारांच्या नोंदी करदात्याला दिसू शकणार असून, करदात्याला आपलं आयकर
विवरणपत्रक भरण्यापूर्वी त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
   अशी कोणती माहिती AIS पोर्टल वर दिसू शकणार आहे ? त्याची यादी आयकर विभागाने नुकतीच सादर केली असून ती साधारण पुढीलप्रमाणे आहे.
१) करदात्याला मिळणारे पगाराचे उत्पन्न
 २) करदात्याने त्याची कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता भाड्याने दिली असल्यास त्याला मिळालेल्या मासिक, वार्षिक भाडे रक्कमेची माहिती
 ३) करदात्याने शेअर्स मध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर दरसाल मिळालेला लाभांश(डिव्हिडंट)
 ४) करदात्याच्या एकूण एक बँक बचत खात्यावर वर्षामध्ये करदात्याला बँकेकडून मिळालेले व्याज रक्कम.
 ५) करदात्याने बँक मुदत ठेवीवर केलेल्या गुंतवणुकीतून त्या आर्थिक वर्षात करदात्याच्या खात्यावर जमा झालेल्या व्याजाची रक्कम,
 ६) बँका, पतसंस्था या व्यतिरिक्त अन्य खाजगी संस्था, फर्म्स मधील गुंतवणुकीवर मिळालेले व्याजाचे उत्पन्न
 ७) आयकर परताव्याचे व्याज (आयकर रिफंड वर प्राप्त व्याज)
 ८) करदात्याने जर त्याच्याकडील मशिनरी प्लॅन्ट भाड्याने दिली असेल तर त्यावरील मिळालेले भाडे रक्कम,
 ९) आयकर कलम ११५ बीबी अंतर्गत लॉटरी किंवा क्रॉसवर्ड पझलमधून मिळालेले उत्पन्न किंवा याच कलमांतर्गत घोड्यांच्या शर्यतीतील  मिळालेले उत्पन्न
 १०) एखाद्या मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीमध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्याची जमा झालेली शिल्लक त्याच्या एकूण उत्पन्नामध्ये समाविष्ट केली असल्यास,अशी रक्कम
११)  इन्फ्राडेट अथवा एनबीएफसी फॉरमॅट अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर डेट फंड (आयडीएफ) आहे, जो विमा कंपन्या, प्रॉव्हिडंट/पेन्शन फंड, यांसारख्या दीर्घकालीन देशांतर्गत/ऑफशोअर संस्थागत गुंतवणूकदारांना एकत्र आणून निधीच्या पायाभूत सुविधांचा पर्यायी वर्ग तयार करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने तयार केला आहे.  इ.त्यातून मिळालेले प्राप्त झालेले व्याज इत्यादी उत्पन्न,(कलम 115A(1)(a) (ia) अंतर्गत)
 १२) अनिवासी 115A(1)(a)(aa) अंतर्गत निर्दिष्ट कंपनीकडून मिळालेले  व्याज
 १३) रोखे आणि सरकारी रोख्यांवर मिळालेले व्याज
 १४) आयकर कलम  115A(1) (a)(ab) अंतर्गत अनिवासी युनिट्सच्या संदर्भात करदात्याला मिळालेले उत्पन्न
 १५) आयकर कलम 115AB(1)(b) अंतर्गत ऑफशोअर फंडाद्वारे युनिट्सचे उत्पन्न आणि दीर्घकालीन भांडवली नफा
 १६) आयकर कलम 115AC अंतर्गत परकीय चलन रोखे किंवा भारतीय कंपन्यांच्या शेअर्समधून प्राप्त उत्पन्न आणि झालेला दीर्घकालीन भांडवली नफा
 १७) कलम 115AD(1) (1) अंतर्गत सिक्युरिटीजमधून परदेशी संस्था मध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळालेले व्याज इ. उत्पन्न
 १८) आयकर कलम  115AD(1)(1) अंतर्गत सिक्युरिटीजमधून निर्दिष्ट निधीचे उत्पन्न
 19). करदाता विमा व्यवसाय करीत असल्यास मिळालेले विमा कमिशन
 २०)  जीवन विमा पॉलिसीच्या पावत्या.
 २१)  राष्ट्रीय बचत योजनेअंतर्गत करदात्याने काढलेल्या ठेवी 
 २२)  लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीवर मिळालेले कमिशन इ.
 २३) सिक्युरिटायझेशन ट्रस्टमधील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न
 २४) म्युच्युअल फंडस अथवा युनिट ट्रस्ट (MF/UTI द्वारे) युनिट्सच्या पुनर्खरेदीमुळे प्राप्त झालेले उत्पन्न
 २५) व्याज किंवा लाभांश किंवा सरकारला देय इतर रक्कम
 २६)  विनिर्दिष्ट ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्न
 २७) जमीन किंवा इमारतीची विक्री
 २८)  स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाचे व्यवहार व त्याची रक्कम
 २९) वाहनाची विक्री
 ३०)  म्युच्युअल फंडाच्या सिक्युरिटीज आणि युनिट्सची विक्री
 ३१) शेअर्स ऑफ मार्केट डेबिट व्यवहार
 ३२) शेअर्स ऑफ मार्केट क्रेडिट व्यवहार
 ३३) करदात्याच्या व्यवसायाच्या पावत्या
 ३४) करदात्याची GST कायद्यानुसारची उलाढाल, विक्री
३५)  करदात्याची GST खरेदी
 ३६)  व्यवसाय खर्च
 ३७) भाडे देयक
 ३८)  विविध पेमेंट
 ३९) वर्षभरातील रोख ठेवी
 ४०) करदात्याने रोख पैसे काढणे अथवा रोखीने केलेल्या व्यवहारांची माहिती
 ४१)  रोख देयके (रोखीने अदा केलेल्या रक्कमा)
 ४२) परकीय चलनाची बाह्य रेमिटन्स/खरेदी
 ४३) परकीय रेमिटन्सची पावती
 ४४)  अनिवासी खेळाडू किंवा क्रीडा संघटनांना 1158BA अंतर्गत केलेले पेमेंट
 ४५) परदेश प्रवास
४६) . स्थावर मालमत्तेची खरेदी.
 ४७)  वाहन खरेदी आणि त्यावरील कर
 ४८) मुदत ठेवींची खरेदी
 ४९) म्युच्युअल फंडाच्या सिक्युरिटीज आणि युनिट्सची खरेदी
 ५०) करदाता वापरत असलेल्या क्रेडिट/डेबिट कार्ड वरील सर्व आर्थिक व्यवहार
 ५१) करदात्याच्या विविध बँक खात्यातील शिल्लक
 ५२) व्यवसाय ट्रस्टद्वारे वितरीत उत्पन्न
 ५३)  गुंतवणूक निधीद्वारे वितरीत उत्पन्न
 ५४) करदाता अथवा फर्म ला मिळालेल्या देणग्या 
 ५५)  व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाचे व्यवहाराच्या नोंदी
५६) आयकर कलम 115 BBJ अंतर्गत ऑनलाइन गेममधून जिंकलेल्या रककमांची माहिती
   अशा जवळपास ५६ व्यवहारांच्या नोंदी यापुढे आयकर विभागाने करदात्याच्या पोर्टल वर समाविष्ट केलेल्या असून, करदात्याने आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीचे आयकर विवरणपत्रक दाखल करण्यापूर्वी या वेबसाईट वर असलेल्या नोंदी व करदाता दाखल करीत असलेल्या विवरण पत्रकातील माहिती ताडून बघणे यापुढे करदात्याच्या दृष्टीने अत्यावश्यक झाले आहे. 
  आयकर विभागाने आता कात टाकलीय, करदात्यांचे पॅन व आधार कार्डचे लिंकिंग झाल्यामुळे करदात्याच्या अनेक मोठ्या आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडे सहज उपलब्ध होऊ लागलेली असल्याने, करदात्याने आपले आयकर विवरणपत्रक दाखल करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचे योग्य मार्गदर्शन घेऊन, त्यावरील कराचा योग्य भरणा करून त्यानंतरच विवरणपत्रक दाखल करणे करदात्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.          शब्दांकन -नितीन दत्तात्रय डोंगरे
             कर सल्लागार , कोपरगांव 

Post a Comment

Previous Post Next Post