नियमित शिक्षणाधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले.

जळगाव: सत्यप्रकाश न्युज 
    जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर एक आठवडा उलटूनही शासनाद्वारा कुठल्याही अधिकाऱ्याची अद्याप नियुक्ती न झाल्याने जिल्ह्यातील सुमारे २२०० उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे माहे ऑगस्टचे वेतन रखडले आहे. वेतनाचा तिढा सुटण्यासाठी तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार कायमस्वरूपी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या पोळा,गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वेतन देयकांवर शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याने सणांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची देयके देखील सही अभावी प्रलंबित आहेत. नियमित वेतन रखडल्याने गृहकर्ज हप्ते तसेच आजारपणाचा खर्च या संदर्भात आर्थिक संकटाचे मळभ गडद झालेले आहे. जिल्ह्यातील सुमारे १०२ अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांसमोर वेतनाचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. यासंदर्भात नाशिक विभागाचे पदवीधर आमदार श्री.सत्यजित तांबे, शिक्षक आमदार श्री.किशोर दराडे यांनी त्वरित लक्ष घालून शासन स्तरावर प्रयत्न करून जळगाव जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून जिल्ह्यातील असंख्य उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा असे साकडे जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव), प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील (जेष्ठ मार्गदर्शक), प्रा.शैलेश राणे प्रा.सुनील पाटील (कार्याध्यक्ष), डॉ.अतुल इंगळे, प्रा.गजानन वंजारी (उपाध्यक्ष) यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post